पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/138

हे पान प्रमाणित केलेले आहे.



मुसलमानी मुलखांतली मुशाफरी



हा नेहमीचा प्रकार आहे. शरीराच्छादनासाठी तीन चार आवरणें असूनही कधी घर्मबिंदु येत नाहीत. उलट 'वरकोट' [ओव्हरकोट] आणि हातमोजे हा नेहमीचाच पोषाक होऊन बसलेला आहे. थंडींत साचलेलें बर्फ उन्हाळाभर वापरण्यांत येते. आइस्क्रीम करण्यास फारसे श्रम पडत नाहीत आणि ते बनविण्याची पद्धतीही अगदी साधी आहे. हलवाई खवा घोटतो त्याप्रमाणे एका लाकडी फळीने दुग्धमिश्रण पांचसात मिनिटें घोटलें की आइस्क्रीम तयार होते. मात्र हलवायाच्या कढईखाली विस्तव असतो तर, आइस्क्रीमवाला आपल्या रुंद तोंडाच्या भांड्याभोवती बर्फाचे खडे ठेवतो; इतकाच काय तो फरक. थंडीतही प्रातःकाळी उठल्यापासून तों रात्रीं दहाअकरा वाजेपर्यंत आइस्क्रीम खाण्याची रीत आहे. बर्फाला किंमतच पडत नाही. तें आणून ठेवलें तर भुश्शांत किंवा पेटींत ठेवण्याची आवश्यकता नसते. बर्फाचे तुकडे घरांतील दारापुढे उघडेच पडलेले असतात. लागतील तसतसे घ्यावे! ते वितळण्यास फार अवधि लागतो. यावरून इकडील थंडीची थोडी तरी कल्पना येईल.

 नेहमी कपड्यांचा भार खांद्यावर असतो म्हणूनच की काय, इराणी लोक धिप्पाड अरबांच्या मानाने खुजे, ठेंगू आणि अशक्त दिसतात. त्यांची शरीरसंपत्ति कितपत आहे हें इतक्या अल्पावधींत कळणें शक्य नाही. पण इतकें मात्र खरें की, इराण्यांना हिंदी जनतेच्या शुभ्र दंतपंक्तीचा हेवा वाटतो! तुमचे दात बर्फाप्रमाणे का आणि आमचे भाजलेल्या रोटीप्रमाणे पिवळसर का? असा प्रश्न प्रस्तुत प्रतिनिधीस किती तरी वेळां विचारण्यांत आला! 'दंतधावन' ही क्रियाच मुळी इराण्यांना ठाऊक नाही असें म्हणावें लागतें. मांसाहाराने दात बिघडतात, हें तर आता तज्ज्ञांचेंच मत आहे. निद्रोत्तर वा भोजनोत्तर

१३२