पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/14

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पेशावरचा किल्ला हल्ली ब्रिटिशांच्या ताब्यांत असून तेथे बिनतारी तारायंत्राचे मोठे स्टेशन आहे.
 अशा या पेशावर शहरीं मराठी बोलणारी मंडळी अगदी दुर्मिळ हें खरें; परंतु आश्चर्य हें की, येथे मुंबईहून चार पांच महाराष्ट्रीय मंडळी मुलामंडळींसह पेशावर पहाण्याच्या उद्देशाने आली होती ! कर्मधर्मसंयोगाने आम्ही सर्व एकाच ठिकाणी उतरलों होतों; म्हणून त्यांच्या सहवासांत चार दिवस झटकन् गेले. आता येथून क्वेट्टा गांठावयाचा व कंदाहारमार्गे काबूलला जावयाचे असा आजचा बेत आहे.

–केसरी, ता. ११ डिसेंबर, १९२८.


( २ )

 अटकेवर झेंडा लावल्याचें स्मारकः–काशी, प्रयाग, गया ही जशी धार्मिक हिंदूंची त्रिस्थळी यात्रा, तशीच मराठी इतिहासप्रेमी जनांची रायगड, रावेरखेडी आणि अटक अशी त्रिस्थळी यात्रा आहे. परंतु भेद इतकाच की, धार्मिक यात्रेकरूंची गर्दी लाखांनी मोजतां येते तशी ऐतिहासिक यात्रेकरूंची गोष्ट नाही. त्यांची गणनाच मुळी करतां येत नाही. कारण ते बहुशः नसतातच! ही परिस्थिति बदलून लवकरच ऐतिहासिक प्रसिद्ध ठिकाणी यात्रा करावयास जाणारे लोक वाढत जातील अशी आशा आहे.

 हे विचार सुचण्याचें कारण हेंच की, मराठ्यांच्या उत्कर्षाचें परमोच्च ठिकाण आणि हिंदु विजयाचा सुमंगल दिवस आज आमच्या आठवणींतून जात आहे. 'अटकेला झेंडा लावणें' ही म्हण प्रचारांतही आली; पण खुद्द अटकेला या प्रसंगाची आठवण करून देणारे स्मारक कांहीच नाही ! “ अटक' हा वास्तविक पंजाबांतला एक