पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/143

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पंचांगवाद इराणांतही आहेच !

करण्यापूर्वीं काळ्या पडद्यांतील ही घाण प्रथम काढली असती तर राष्ट्राचें अधिक हित झालें असतें ! या घातक पद्धतीने काय आपत्ति कोसळते यासंबंधी चर्चा करणे इष्ट नव्हे. साध्या कल्पनाशक्तीसही तिचें आकलन होण्यासारखें आहे.
  मनुष्यास भेटण्याची आपलेकडील प्राचीन पद्धति म्हणजे आलिंगन देऊन बाहूंत कवळण्याची आहे. आता चोहोकडेच हस्तांदोलन रूढ होत असल्याने जुनी रीत क्वचित् पाळतात. परंतु इकडे एकच पद्धति पूर्वीपासून चालू आहे. दोन्ही गालांचें व नंतर कपाळाचें चुंबन घेण्याची चाल इराणांत आहे. ती फक्त जुन्या मताच्या लोकांतच आढळते आणि कोणी परगावीं चालला अथवा जाऊन आला म्हणजे सर्वांनी त्याचें चुंबन घ्यावयाचें असा इकडील रिवाज आहे. हा प्रकार फक्त पुरुषांचाच चाललेला नेहमी दिसतो.

  पंचांगवाद आपलेकडेच आला आहे असें नसून या बाबतींत इराणी लोक आपले भाईबंद आहेत, ही समाधानाची गोष्ट होय. नेहमीच तीन पंचांगें (?) जवळ बाळगावीं लागावीं अशी इराणी परिस्थिति आहे. इराणी वर्ष हें सौरमानाचें असून पैगंबराच्या पलायनदिनापासून त्याची गणना होते. इतर मुसलमान देशांत वर्षगणनेचा आरंभ पैगंबरपलायनाचा दिवस असलां, तरी त्यांची वर्षे चांद्रमासाचीं असल्याने फरक पडतो. शिवाय अरबी महिन्यांची नांवें आणि इराणी महिन्यांचीं नांवें एक नाहीत. आपल्याकडे भाषाशुद्धीचा प्रयत्न कसोशीने चालू आहे, तसाच इराणांतही चार पांच वर्षांपासून सुरू असून परकी शब्दांवर त्यांचा कटाक्ष आहे. विशेषतः अरबी भाषेचें वर्चस्व त्यांना नको असल्याने अरबी शब्दांना अर्धचंद्र देण्याचें कार्य सरकारी सहाय्यानेच चालू आहे. महिन्यांचीं नांवें तर बदललींच,

१३७