पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/147

हे पान प्रमाणित केलेले आहे.

रंगाचा बेरंग होतो

हिमवृष्टि होते, केव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश असतो, केव्हा केव्हा पावसाळ्याची आठवण करून देणारी झिमझिमही चालू असते. असे सर्व प्रकार एक दोन तासांच्या अवधींत घडून येतात! त्यामुळे निसर्गाच्या ऋतूंचा कार्यक्रम या प्रांतीं अत्यंत अनिश्चित असावा असें वाटतें.
 असें असलें तरी, एकंदर हवामानामुळे मनास सदैव आल्हादित ठेवणारें वातावरण निर्माण होतें. कारण पावसाच्या झिमझिमीमुळे धुरळा उडत नाही; आणि थंडी असल्यामुळे काम करण्यास नेहमी उल्हास वाटतो. मुंबईस किंवा उष्ण कटिबंधांतल्या देशांत मजुरांकडून काम कमी होतें त्याचें एक कारण तेथील उष्ण हवा हेंच होय. पण समशीतोष्ण कटिबंधांत गेल्यानेही कांही नुकसान होतेंच. सूर्य डोक्यावर सहसा यावयाचा नाही; क्षितिजावरून उगवून तिरपा तिरपा असाच तो मावळतो. मग कडक ऊन कोठून मिळणार? आणि सूर्यप्रकाशामुळे होणारी नैसर्गिक स्वच्छता तरी इराणी प्रजेस कोठून लाभणार? तीच गोष्ट चांदण्याची. सुंदर, शोभिवंत उपवनें, उत्तमपैकी फळफळावळ व हरप्रकारचा सुका मेवा यांची चंगळ पूर्णपणे उपभोगण्यासाठी शुभ्र चांदणें वर्षातून कांही दिवस तरी नियमितपणे मिळतें तर गुलहौशी व रंगेल इराण्यांच्या सुखास पारावार उरला नसता. पण कमालीची थंडी, मधून मधून होणारी हिमवृष्टि व स्वेच्छाचारी मेघ मध्ये विघ्नें आणून रंगाचा बेरंग करून टाकतात.

--केसरी, ता. १४, २१ व २८ मे, १९२९.





१४१