पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/151

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानांसमवेत ‘बिसमिल्ला'

रस्ता ज्या गावांमधून जाई तेथे असे काहवाखाने असत. त्या त्या गावांतला मुख्य मार्ग आणि तेहरान-मशहद हा रस्ता हे कांही भिन्न नसत. दोन घरांमधील अरुंद भाग किती तरी ठिकाणी 'रस्ता' म्हणून उपयोगांत आणला जाई. एक मोटार कशीबशी निघून जाण्याइतकीच ती वाट असे. पण तशा अडचणींतूनही रहदारी जोराने चालते. दुसरा मार्गच नाही, मग काय करावयाचें ? पांच रात्रीं पांच वेगळ्या ठिकाणीं मुक्काम झाला. तेथे गेल्याबरोबर जे पुढे येईल त्यावर हात मारून आडवें व्हावयाचें हा ठरलेला कार्यक्रम असे. बरोबरचे प्रवासी लोक 'बिसमिल्ला'साठी निमंत्रण देत आणि मी हिंदी मुसलमान आहें, अशीच सर्वांची समजूत असल्याने ती विनंती नाकारतां येत नसे. भोजनप्रसंगीं दुसऱ्यास खाद्य पदार्थाचा आस्वाद घेण्यास विनंती करावयाची असली म्हणजे बिसमिल्ला कर असें आपल्याकडील मुसलमानही सांगतात. तशापैकीच तो प्रकार. मुसलमान मंडळींच्या हातांत असलेल्या रोटीचा थोडासा तुकडा घेऊन मला त्यांच्या मनाचे समाधान करावें लागे.

 पण अशा वेळीं घडलेली एक गमतीची गोष्ट सांगतो. दोन प्रहरच्या भोजनासाठी मी एके खेडेगावीं थांबलों असतां तेथील बाजारांतील लोकांशी मिळून मिसळून तेहरानमधील प्रचालित सुधारणे-विषयी त्यांचे काय मत आहे तें पहावें म्हणून एका दुकानांत शिरलों. मी 'नफर-इ-हिंद’ -हिंदी मनुष्य– हें न सांगतांच कळलें आणि हिंदी मनुष्य इराणांत आलेला म्हणजे तो मुसलमानच अशी समजूत सर्वत्र असे, माझ्या पथ्यावर पडे. इराण फार चांगले आहे असें मी म्हटलें. इराणी लोकांनीही हिंदुस्थानांतील ‘गॅर्मी' (उष्णता),तेथे मिळणारा पुष्कळ पैसा, कामही भरपूर इत्यादि ऐकीव गोष्टींचे

मु. १० १४५