पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/158

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

उलट उत्तर हिंदुस्थानचे लक्ष दख्खनकडून येणा-या समरपटूकडे लागले यांतच त्यांची योग्यता दिसून येते.

  मशहद ते दुजदाब हा रस्ता इंग्रजांनी हिंदी मजुरांकरवी करविला तो का व केव्हा हें सांगण्याचें प्रस्तुत काळीं प्रयोजन नाही. इराणांतील बहुतेक मुख्य रस्ते हिंदी लोकांनीच केलेले आहेत आणि ते सर्व इराणी सरकारास दान दिल्याप्रमाणे फुकटांत मिळाले. मशहदपासून दुजदाब सुमारे ५५० मैल असून प्रथमचा रस्ता डोंगरांतून तर नंतरचा रखरखीत वाळवंटांतून गेला आहे. मैलच्या मैल गेले तरी पाण्याचा थेंब दृष्टीस पडत नाही. हा प्रवास त्रासदायक असला तरी अविस्मरणीय असाच झाला. बर्फाच्या अनुपमेय शोभेमुळे बगदाद–तेहरान रस्ता विसरणे शक्य नाही. तसेच मशहद-दुजदाब आक्रमण वाळवंटाच्या देखाव्या (?)मुळे स्मृतिफलकावरून जाणें अशक्य आहे! डोंगरांतील चढाव फारच कठीण आहेत आणि उतारही साहजिकच धोक्याचे असल्याने एकसारखें लक्ष ‘सबसे प्यारा जान' सुरक्षित कसा राहील इकडे लागते. मोटार अपघातांतून म्हणजे कोलांडून पडतांना दोनदा वाचली होती. प्रस्तुत लेखकाचा एक डोळाही कायमचा जाणार असा प्रसंग आला होता, पण सर्व थोडक्यांत बचावलें! अशा सत्त्वपरीक्षेंतून शीरसलामत बाहेर पडलों ही जगदीशाची कृपाच म्हणावयाची ! केसरीच्या वाचकांशी बोलतांना जगदीशाचे नांव घेत आहें. इराणांत असतांना कांहीही झाले की 'माशा अल्ला'(ईश्वरेच्छा) असें म्हणावें लागे किंवा 'इन्शा अल्ला' हा प्रयोग उपयोगांत आणावा लागे. "आपण तासाभराने दुजदाबला पोहोचूं" असे साधें वाक्य उच्चारतांनाही त्यांत 'इन्शा अल्ला' हें भूषण अडकविणें इष्ट व आवश्यक असे. 'परमेश्वराची कृपा असल्यास' असा त्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे.

१५२