पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/164

हे पान प्रमाणित केलेले आहे.



मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पोहोचले असल्याने त्यांचा सर्व कारभार वजीर पहातो आणि वजीर हे माजी ब्रिटिश नोकरींतले असल्याने त्यांच्या कर्तबगारीचें वेगळे वर्णन नकोच. बलुचिस्तानचे धृतराष्ट्र स्वतंत्र असल्याचें इंग्रज अधिकाऱ्यांनी इ. स. १८७६ च्या तहाने मान्य केलें. आणि आम्ही ब्रिटिश सरकारच्या सहकार्याने राज्यव्यवस्था पाहूं, आणि इंग्रजांच्या तंत्राने चालू असें खानसाहेबांनी कबूल केले. ब्रिटिशांच्या वतीने गव्हर्नर-जनरलचे क्वेट्टा येथील एजंट यांनी कलातच्या खानांच्या ‘राजकीय' कारभारावर देखरेख करावी असें ठरलें आहे. मग स्वातंत्र्य उरलें कोठे ? पण पुस्तकांत आणि कागदोपत्रीं कलाताधिपति स्वतंत्र मानले जातात.

  दुसऱ्या अफगाण युद्धाने पिशिन, शोरारूद, दुकी, सिबा आणि शारीग हे जिल्हे इंग्रज निशाणाखाली आले. नंतर सुमारे तीन वर्षांनी म्हणजे इ. स. १८८४ मध्ये 'खानांनी सालिना पंचावन्न हजार रुपये घेण्याचें मान्य करून क्वेट्टा व बोलन हे दोन जिल्हे इंग्रजांना दिले. बोरी व्हॅली हा लष्करी ठाण्यासाठी एक भाग इ. स. १८८६ मध्यें आपण होऊनच ब्रिटिशांनी घेतला. आणखी एका वर्षाने खेतरान प्रांत हवासा वाटल्याने तोही लाल रंगाने रंगून गेला! झोबकाकर व खुरासान हे जिल्हे इंग्रजी अमलाखाली येणे आवश्यक झाले. इ. स. १८९९ मध्ये खानसाहेब ‘नुष्कीचा भाग घ्या' म्हणून सरकारच्या मागे लागले, तेव्हा त्यांना सालिना नऊ हजार रुपये देण्याचे मान्य करून तोही भाग आपल्या सत्तेखाली ब्रिटिश सरकारने घातला. नसिराबादचा जिल्हा इ. स. १९०३ मध्ये 'भाड्याने' घेतला. त्याला दरसाल रु. १,१७,५०० द्यावे लागतात. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे हें सर्व भाडें दरसाल आजन्म चालू रहावयाचें आहे.आणि

१५८