पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/174

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

आपण क्षणभर भांबावून जातों यांत नवल नाही. परंतु लवकरच आपणांस 'हा सर्व आभास आहे व जिकडे तिकडे आरसे लावल्यामुळे ही चमत्कारसष्टि निर्माण झाली' हें ज्ञान होऊन, थोडा वेळ का होईना, पण आपली दिशाभूल झाली म्हणून हसू आल्याशिवाय रहात नाही. वस्तुस्थिति अशी आहे की, जिन्याच्या दोन पायऱ्यांतील भागाला आरसे लावले असून सभोवतालच्या सर्व भिंतीही आरशांनीं अगदी मढवून टाकल्या आहेत! तेव्हा ह्या आयनेमहालांत येणारा मनुष्य 'प्रज्ञाचक्षु' असेंल तरच त्याला आपल्या दृक्पथांत कांही विशेष आलें असें वाटणार नाही. किंबहुना कितीही विचारमग्न मनुष्य असला तरी, त्याचे मनोव्यापार घटकाभर स्तिमित करण्यास जिकडे तिकडे दिसणारी हीं आपलीं प्रतिबिंबें पुरेशीं होतात. राजवाडा सध्या 'निर्जन' झाला असून तो पहावयासाठी येणाऱ्या एकट्यादुकट्यांस 'एकांत'वासामुळे कंटाळा येऊ नये म्हणून ही ‘एकोऽहं बहु स्याम्'ची तरतूद केली आहे की काय, असें वाटतें. आरसा ही चीज सर्वांच्या नित्य परिचयाचीच आहे. पण त्याच्या सहाय्याने अशी करमणूक करून घेतां येईल, ही कल्पना फारच थोड्यांच्या डोक्यात येईल! अर्थात् राजवाड्याचा मुख्य कारागीर मोठा चतुर योजक असला पाहिजे यांत शंका नाही.

  येणेप्रमाणे आपल्या अनेक प्रतिबिंबांशी स्मितपूर्ण मुद्रेने मूक संभाषण करीत वर आल्यानंतर आपल्या उजवीकडे पदार्थसंग्रहालयाचा विस्तृत दिवाणखाना लागतो व डावीकडे परराष्ट्रीय वकील बसण्याचें दालन दिसतें. दरबारप्रसंगीं अथवा कांही समारंभांसाठी जेव्हा तेहरानमधील सर्व राष्ट्रांचे मुखत्यार गुलिस्तानमध्ये उपस्थित होतात, तेव्हा आपापला वैरभाव विसरून सर्कशींतील सहभोजन प्रसंगी सिंहापासून शेळी-कुत्र्यापर्यंत यच्चयावत् चतुष्पाद जसे एकत्र जमतात,

१६८