पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/188

हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिशिष्ट तिसरें : प्रवासांतील मौजा
 'नांव बदलून ठेवणे ' ही जरी आपणांकडे अशक्यप्राय बाब असली तरी इराणच्या प्रवासांत ती प्रत्येक गावोगाव होत असल्याचा मला अनुभव आला. मुसलमानांना इकडील नांवांची माहिती नसल्याने व विशेषतः फार्सी लिहिण्याची पद्धत सदोष आहे म्हणूनच हा प्रसंग प्रत्येक ठिकाणीं येई. स्वरचिन्हांचा उपयोग फारसा न करतां केवळ उच्चारित व्यंजनेंच लिहिण्यामुळे प्रत्येकाच्या मर्जीनुरूप त्याचा उच्चार होऊं शकतो. माझें नांव पुढे पुढे मी लिहून घेऊं लागलों. अगदी प्रथम तर माझें मलाच हसूं येई. त्यामुळे तेथील पोलिस मात्र रागावत. नांव विचारतांच आपल्याकडील रिवाजानुसार मी सबंध नांव सांगितले. नांवाच्या लांबीमुळे व अपरिचित शब्द कानी पडल्याने तो अधिकारी तर भांबावलाच. "मेहेरबानी करून एकेक शब्द सांगा," म्हणून त्याने विनंती केली व त्याला अडचण पडूं नये. म्हणून मीही प्रत्येक अक्षर सावकाश उच्चारून सांगितलें. मुंग्यांच्या पायांप्रमाणें असलेल्या लिपींत त्याने सर्व लिहून घेतलें. आणि "इस्म-इ-पिदर?" - बापाचे नांव ?- म्हणून लगेच दुसरा प्रश्न केला. संपूर्ण नांव हें त्याला माझ्या 'पाळण्यांतल्या' नांवाप्रमाणे वाटलें. सर्व कांही त्यांत आलें, बापाचें नांव वेगळें नाही, असें सांगून त्याची समजूत करावी लागली.

  *
*
  • *

 तेहरानमध्ये माझ्या नांवाचें भाषांतर करून देण्याबद्दल तीन पोलिस अधिकारी आठवडाभर मजकडे येत. इंग्रजी नांव आम्हांला नको, 'फ्रान्सी' अथवा फार्सी भाषेंत तर्जुमा करून द्या, हीच त्यांची मागणी. इंग्रजीशिवाय मला दुसरी भाषाच येत नाही असें सांगून तें काम टाळलें.

१८२