पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/194

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

म्हणजे हिंदुमुसलमानांची तेढ जेथे विशेष आहे, त्या प्रांतांतला. त्याने तत्काळ प्रश्न केला, "तुम्ही हिंदु की काय?"
 सर्व यात्रेकरू डोळे फाकून, कान टवकारून, उत्तरासाठी अधीर झाले. गेले दहा बारा दिवस ते माझ्या बरोबर होते. मी मुसलमानच अशी त्यांची पक्की खात्री झालेली. त्यांच्या बरोबर जेवणखाण मी केलें असल्याने त्याबद्दल त्यांना शंका नव्हतीच. पण त्या अधिकाऱ्याने तसा प्रश्न केलेला पहातांच त्यांनाही विचित्र वाटले. आपणांला या हिंदी गृहस्थाने चकविलें तर नाही ना असा संशयही त्यांचे मनांत आला. मला तर मोठी पंचाईत पडली. हिंदी अधिकाऱ्याजवळ पासपोर्ट असतां खोटें बोलणें शक्य नव्हतें व तें पचलें नसते. बरें, खरें सांगावें तर तें इष्ट नव्हतें. म्हणून वेळ न दवडतां मी लगेच त्या अधिकाऱ्याला उत्तर दिलें,
 "छट् –हम् हिंदु नै है -हम् बम्मन है!"
 पंजाब्याला बम्मन या शब्दाचा अर्थच कळत नाही. पंडत, वैष्णव अथवा आर्य अशा नांवांनीच तो ब्राह्मणांना ओळखतो. माझेंही काम साधलें व सर्वच मंडळी पूर्ववत् मोकळेपणाने बोलं लागली. इराण्यांना तरी बम्मन किंवा ब्राह्मण याचा अर्थ काय कळणार?
 अशी मौज किती तरी झाली!

-मौज, दिवाळी, १९२९.


१८८