पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/27

हे पान प्रमाणित केलेले आहे.




दोन्ही धोरणांची चर्चा

या प्रकारचेंच ते उदाहरण होईल. पण “शिक्षा देव तयाला करिल म्हणोनि उगाच बैसावें" अशी दुर्बल वृत्ति शिकविणारे ख्रिस्ती मिशनरी आज तीस पस्तीस वर्षें अफगाण सरहद्दीवर ठाणें देऊन येशूच्या उदाहरणाने रानटी लोकांची मनोवृत्ति पालटण्याचा प्रयत्न करीत आहेत! ‘मधुबिंदुनें मधुरता' आणण्याचाच हा प्रयत्न नव्हे काय?

 ब्रिटिश सरकारचीं सरहद्दीविषयीचीं दोन धोरणें आहेत. एक पुरोगामी ( फॉर्वर्ड पॉलिसी ) व दुसरें संतुष्ट वृत्ति ( क्लोज बॉर्डर पॉलिसी). पुरोगामीचे पुरस्कर्ते म्हणतात की, येन केन प्रकारेण मिळालेल्या ओसरीवर पाय पसरावे. आणि याच धोरणाने पुष्कळ पैसा खर्चूनही खैबर घाटांत आणि वजिरिस्तानांत ब्रिटिशांचा प्रवेश झाला आहे. संतुष्ट धोरणाचे लोक असे म्हणतात की,"आपल्या हद्दीपलीकडे जातां कशाला? तिकडले रानटी लोक आपसांत भांडून मरेनात ? तुम्हांला त्याचें काय? आपल्या हद्दीवर एक मोठें आवार (कॉंपाउंड) बांधून टाका. चीनला भिंत आहेच. तशीच पाहिजे तर बांधा आणि पलीकडे मुळीच पांहू नका." हिंदुस्थान सरकारला ही दुसरी विचारसरणी अगदी पसंत पडत नाही. याची अनेक कारणें आहेत. लुडबुडण्याला क्षेत्र नाहीसें होईल ही पहिली भीति. हिंदुस्थानांतील राज्य केवळ तरवारीच्या जोरावर प्रजेच्या इच्छेविरुद्ध चालत असल्याने तें उलथून पाडण्याचा प्रयत्न करणारे या स्वतंत्र मुलखांत येऊन सारखा त्रास सरहद्दीवर सुरू करतील ही दुसरी भीति. गोऱ्या बाळांची लागलेली वर्णी आणि लष्करी खात्याप्रीत्यर्थ विलायतेला जाणारा पैसा, ही सर्व बंद पडतील म्हणून भीति वाटतेच. अफगाणिस्तान व स्वतंत्र रानटी लोक यांचें मेतकूट जमलें तर कठीण प्रसंग ओढवेल अशीही धास्ती आहेच. आणि छूः म्हणून

२१