पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/29

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आळी मिळी गूप चिळी

लिहिलें आहेच. त्यानंतर म्हणजे गेल्या दोन तीन दिवसांत आणखीही विमानें काबूलला गेलीं होतीं व परतही आलीं. इंग्रजी वकिलातींतील अधिकाऱ्यांची बायकापोरें हल्लीच्या धांदलीच्या काळीं काबुलला राहणें इष्ट नसल्याने त्यांना पेशावरला आणण्यासाठी या आकाशयानांचीच योजना शक्य होती व तदनुसार तें काम पूर्णपणे यशस्वी झालें. इतकेंंच नव्हे तर, फ्रेंच व जर्मन वकिलांच्या कुटुंबांतील कांही मंडळी येथे सुरक्षिततेसाठी आली आहेत. अर्थातच यांच्याकडून काबूलमधील परिस्थितीची खरी माहिती मिळण्याचा संभव होता. पण मोठ्या कडेकोट बंदोबस्तांत या सर्व राजकीय पाहुण्यांची सोय केली असल्याने त्यांचें नुसतें दर्शन होणेंच मुष्कील झालें आहे. पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून गेल्यावर त्यांना कोणाजवळ कांहीही न बोलण्याची सक्त ताकीद असल्याचें कळलें ! शिवाय त्या पडल्या जर्मन अथवा फ्रेंच स्त्रिया. त्यांना इंग्रजी पूर्णपणे येत नाही ही अडचण कशी तरी दूर करावी तर,'आळी मिळी गूप चिळी'ची धोंड मधली मुळी हलत नाहीच! बरें, इंग्रज वकिलांची पत्नी लेडी हंफ्रेस् या बाईची गांठ घ्यावी म्हटले तर, त्या येथील चीफ कमिशनरकडे उतरलेल्या! वायव्यप्रांताच्या 'राजा'कडे ह्या खाशा पाहुण्या! तेव्हा अगोदर दाद लागण्यासच वेळ लागला! चीफ कमिशनरचे सेक्रेटरी चौकशीला आले की, कोणत्या पत्राचे प्रतिनिधि पाहुण्या बाईची भेट घेऊ इच्छितात? 'केसरी'चें नांव सांगतांच त्यांना काय वाटलें कोणास ठाऊक, त्यांनी आंतून जाऊन कमिशनरचा निरोप आणला की, इंटेलिजन्स खात्याच्या (सी. आय. डी.) वरिष्ठांकडे जा व तुमच्या वर्तमानपत्रासंबंधी त्यांचे मत लिहून आणा. चीफ कमिशनरनी मागितलें आहे.

२३