पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/30

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

  मुलाखतीचा निष्फळ प्रयत्न—सी. आय. डीच्या वरिष्ठांकडे जाताच त्यांनी कशासाठी मत पाहिजे असा प्रश्न केला. सर्व हेतु सांगतांच ते म्हणाले,'केसरी' हे दैनिक का साप्ताहिक आहे? कोठे निघतें हें वर्तमानपत्र? संपादक कोण? त्यांची शंकानिवृत्ति करण्यासाठी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरें दिली. श्री. केळकरांचे नांव घेतांच ते वरिष्ठ गुप्त पोलीसाधिकारी म्हणाले की, "ओ, मि. केळकर माझ्या परिचयाचे आहेत. त्यांना आम्ही सरहद्दीवर नेलें होतें." इतर कांही बोलणें झाल्यावर त्यांनी टेलिफोनमधून आपल्या हाताखालच्या अधिका-यांकडून केसरीसंबंधी माहिती विचारली आणि "मि. केळकरांचे 'केसरी' हे साप्ताहिक जबाबदारीने चालविले जात आहे" असे आपलें मत लिहून दिलें.
 एवढ्याने लाटांचें समाधान झालें. म्हणजे लेडी हंफ्रेस यांना मुलाखत देता का? असा प्रश्न विचारण्यास अनुज्ञा मिळाली! परंतु अस्वस्थ मन असल्याने किंवा कांही अन्य कारणाने, त्यांनी दिलगिरी प्रदर्शित करून नकार दिला! समाधानाला जागा इतकीच होती की, दुस-या कोणत्याही वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीस त्यांनी मुलाखत दिली नाही व बहुधा देणारही नाहीत!

  अफगाणिस्तानांतून तारा व टपाल सध्या कंदाहारमार्गे येत आहेत. नेहमीचा खैबर घाटामधला डाका-जलालाबाद हा रस्ता तर बंद आहेच. पण ताराही तोडल्या गेल्या असल्याचे समजतें. लंडीखाना म्हणजे ब्रिटिशांचे अखेरचें ठाणें. हे खैबर घाटांत आहे. तेथपर्यंत तार व टेलिफोन असल्यास नवल नाही. पण तेथून पुढे अफगाणिस्तानची हद्द आहे व त्या प्रांतांतून गेल्याविना तर चालत नाही. काबूलशी हिंदुस्थानचा तारायंत्रद्वारा संबंध असणें व्यापारी दृष्टीने आवश्यक नसलें

२४