पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/32

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

खेडवळ जनतेस औषधपाण्याचा उपाय म्हणजे हाच! थोर साधूच्या कापडाची चिंधी बांधणें म्हणजे नवस करण्यापैकीच प्रकार आहे. तेथील झाडास विशेषच थोरवी येते. त्या झाडाचा पाला सर्व रोगांवर किंवा हर प्रकारच्या जखमांवर रामबाण उपाय मानला जातो. अशा फाटक्या चिंध्यांशिवाय दुसरें कापड फडकतांना दिसत नाही.

 आफ्रिदी लोकांची स्वतंत्र वृत्ति--या प्रांतांत विशेष प्रामुख्याने गोष्ट दिसत असेल तर ती म्हणजे लोकांची स्वतंत्र वृत्ति. मुसलमान इसम म्हणजे अदबीने कंबर लववून सलाम करणारा असा आपणांला ठाऊक असतो. परंतु इकडील प्रांत त्यांचा नूर अगदी पालटलेला दिसतो. अत्यंत स्वतंत्र आचाराचे हे रानटी लोक पाहिले की, यांच्या बेफाम वर्तनाचे कौतुक करावेंसें वाटतें आणि आपणांस असें भाग्य कधी लाभेल काय हा विचार मनात येतो. सर्वांत मौज वाटते ती त्या वन्य पण स्वतंत्र लोकांना भिऊन वागणाऱ्या आपल्या लोकांची. ब्रिटिश अधिकारी असोत किंवा दुसरे व्यापारी अथवा इतर साधे लोक असोत, ते या स्वतंत्र प्रांतांतील लोकांना भिऊन इतके नरम येतात की, अगदी लवून सलाम करून किंवा अशाच नम्रतेने त्यांच्यापुढे हांजीहांजी करतात! रस्त्याच्या अगदी बाजूला म्हणजे दहा बारा पावलांवरच बंदुका तयार करण्याचा मोठा कारखाना आहे. ब्रिटिश मुलखांत बंदुका बाळगण्यास परवाना लागतो तर येथे ती शस्त्रे दिवसाढवळ्या अगदी भर रस्त्यावर बनवीत असतात. हें दृश्य प्रथमतः जरासे विचित्रच दिसतें. पण लष्करी अधिकारी तेथे तो कारखाना पहाण्यास येऊन अचंब्याने चकित होतात. रानटी लोक, अक्षरशत्रु, पाश्चात्य यंत्रशास्त्राची जानपछान नसलेले, अगदी नवीन प्रकारच्या रायफल्स व बंदुका तयार करतात

२६