पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/34

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पदार्थांचा तुटवडा पडला म्हणतात. मदिरा संपुष्टात आली असल्याने त्यांना मोठी काळजी होती की, हा मोठा वार्षिक सण ‘सुका' जाणार की काय? पण काबुलांतच दरवडेखोरांची टोळी आल्याने दुकानें वगैरे बंद होतीं आणि कित्येकांचीं आवडतीं कुटुंबांतील माणसें या नाताळाच्या आदले दिवशींच हिंदुस्थानांत निघून आलीं ! मोठ्या सणाचा हा बेरंग झाला खरा; परंतु जिवावर बेतलें होतें तें शेपटावरच बचावले असे म्हणतात तशापैकी हा प्रकार होय. येथे पेशावरला मात्र या सणाचें स्वरूप स्पष्ट दिसलें; छावणीभागांत सोजिरांची गंमत पाहून सर्व लोकांना फार मौज वाटली ! मोठमोठ्या रस्त्यावरून केवळ तास दीड तासासाठीच दुपारी हिंडावे लागले. तेवढ्यांत तीन सोजीर तीन ठिकाणी झिंगत गटारांत लोळत असलेले दिसले. मदिरेचा पूर्ण अंमल त्यांजवर बसलेला होता आणि या सणाचें माहात्म्य त्यांतच आहे!
 आपल्याकडे फाल्गुनांत पौर्णिमेला होळी करतात. तशीच इकडे संक्रांतीस होते. आतापासून सायंकाळी लहान मुले घोळका करून लांकडे गोळा करण्यासाठी गाणी म्हणत हिंडत असतात. विशेषेंकरून डोळ्यांत भरण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलींचीही वेगळी होळी होते. त्याही कंपू करून पैशासाठी किंवा लांकडांसाठी शेजाऱ्यापाजाऱ्याकडे मागणी करतात.
 थंडीचा कडाका जरा जास्त होऊं लागला आहे. दिवस तर पांच सवापांच वाजण्याचे सुमारासच मावळतो. पाऊस बरेच दिवसांत पडला नाही. दहा बारा मैलांवर दिसणा-या निळसर टेकड्यांच्या माथ्यांवर शुभ्र बर्फ पडलेलें दिसतें.

-केसरी, ८ जानेवारी, १९२९.



2८