पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/35

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अँग्लो-इंडियनी कुर्रा

( ५ )

 आम्ही हिंदुस्थानचे राज्यकर्ते आहोत, ही गुर्मीची भावना इंग्रजांच्या मनांत कशी प्रबल असते हे पहाण्याचा प्रसंग आला. काबूलहून हवाई जहाजें वरचेवर येऊ लागली आणि त्यांतून बरीच मंडळी पेशावरास आली. त्यांच्या कडून मिळालेली माहिती कित्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांना असावयाची. म्हणून अशा अधिकाऱ्यांना भेटण्याचा व प्रचलित परिस्थितीसंबंधाने बोलण्याचा उपक्रम मी चालविला. याच सुमारास लाहोरच्या वातावरणांत मुरलेले आणि अँग्लो-इंडियनी धोरणाचे पुरस्कर्ते असे एक गृहस्थ भेटले. त्यांच्याशी संभाषण करतांना वरचेवर "आम्ही अगदी तटस्थ वृत्तीने सर्व हालचालीं पहात आहोंत," "शिनवरी आम्हांला मुळीच त्रास देत नाहीत," इत्यादि वाक्यांत ‘आम्ही' या शब्दाचें राहून राहून आश्चर्य वाटे. सरकारी अधिकारीही सरकार असा तृतीयपुरुषी निर्देश करीत असतां या भाडोत्री इसमांनी प्रथमपुरुषी बहुवचनाचा मान आपण होऊनच लाटावा हें विचित्र होय. पुढे आणखी बोलणे चाललें असतां ते गृहस्थ म्हणाले,"आम्ही या सर्व पाहुण्यांची आमच्या खर्चाने तजवीज करीत आहोत. त्यांची इतक्या उत्तम प्रकारे सरबराई आम्हांस आणखी बरेच दिवस करावी लागेल." या वेळी मात्र मध्ये बोलल्यावाचून राहवेना. "म्हणजे हे सर्व खास हिंदुस्थान सरकारचेच पाहुणे ना ? प्रजाजनांकडून मिळालेल्या करांतूनच यांचे आदरातिथ्य व्हावयाचे. तेव्हां पर्यायाने हिंदी प्रजाजनांनीच या पाहुणे मंडळीचे आदरातिथ्य चालविलें आहे, असेच ना आपले म्हणणे ??" असा त्याला परत प्रश्न करतांच स्वारी शुद्धीवर आली व म्हणाली की,"हो, हो, तसेच. पण हा खर्च वैमानिक खात्यांत घातला जाईल आणि तो कायदेमंडळापुढे चर्चेलाही येऊन

२९