पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/41

हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाखवे लोकांची तारांबळ

दिवशीं पहिला मुक्काम बुशायर येथे झाला. बुशायर हें इराणी आखातांतील महत्त्वाचे बंदर आहे. म्हणजे येथे धक्का किंवा गोदी बांधलेली नसून इराणी सरकारला जकात मिळण्याचे ते एक मोठे नाकें आहे असे म्हणण्यास हरकत नाही. कारण बंदरांत पाणी फारच उथळ असल्याने मोठमोठ्या बोटी दूरदूर नांगर टाकतात, म्हणून लहान मचव्यांतून माल व उतारू यांची ने-आण करावी लागते, रत्नागिरी बंदरांत जी गैरसोय होते तीच पण अधिक मोठ्या प्रमाणावर बुशायर येथे होते. यंत्रसामग्रीवर कोणत्याच प्रकारची आयात जकात नसल्याने आणि आधुनिक सुधारणेकडे लोकांचा विशेष कल असल्याने मोटारींची इराणांत आयात फारच होत आहे. आपणांकडे मोटारीवर तीस टक्के कर असूनही इतका प्रसार झाला, मग इराणांत रेल्वेचा फारसा प्रवेश नसतां मोटारींची विशेष जरुरी भासली तर आश्चर्य कसचे ? या सर्व मोटारी व इतर जड यंत्रे उतरवून ती लहान बोटींवरून न्यावयाची म्हणजे किती तरी त्रास होतो. रत्नागिरीच्या आजूबाजूला फार खडक असल्याने तेथील खलाशी दर्यावर्दीपणांत मुरलेले समजले जातात. तीच गोष्ट बुशायरची आहे. खडक नसला तरी येथे समुद्र नेहमीच खवळलेला असतो आणि तुफानी हवा असली म्हणजे तर विचारावयासच नको ! नाखवे लोकांची उडालेली तारांबळ पाहून त्यांच्या चिकाटीची आणि नौकानयनाच्या कौशल्याची प्रशंसा करावी, का त्यांच्या हालअपेष्टांच्या मानाने मिळालेली कमी मजुरी पाहून त्यांची कीव करावी हेच समजेनासे होते. या सुधारलेल्या जगांतही अशा गरीब लोकांना जनावरांसारखे राबूनसुद्धां पोटभर वेतन मिळत नसेल तर मग, त्या सुधारणेचे श्रेष्ठत्व कशांत आहे, आणि तिचा उपयोग तरी काय ? असे विचार मनांत आले.

३५