पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/50

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

मिळावें. पण इराकी पुढाऱ्यांची यालाही मान्यता नाही. ते म्हणतात, फार तर चार वर्षे आम्ही तुमची देखरेख मान्य करू. पुढे मग आमचे आम्ही स्वतंत्र आहोंत. ह्या वादाचें भिजत घोंगडें बरीच वर्षे चालून १९२६ मध्ये झालेल्या तहान्वयें पंचवीस वर्षे मँडेटरी सत्ता रहावी असें ठरलें. पण त्यालाच एक पुस्ती अशी जोडली आहे की, इराक राष्ट्रसंघांत सामील होईपर्यंत अथवा पंचवीस वर्षे !
 या व अशाच मतभेदांमुळे राज्यकारभार चालविणे अशक्य झालें व मंत्रिमंडळाने राजिनामा दिला. तो राजेसाहेबांनी स्वीकारला असून नवीन मंत्रमंडळ निवडण्याची खटपट चालू आहे. परंतु संरक्षणाचें खातें सर्वस्वी राष्ट्रीय झाल्याविना कोणीही अधिकार घेऊं नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपल्या अनुयायांना दिली असल्याने मंत्रिमंडळ बनविणें जरा कठीणच काम आहे.

--केसरी, ता. १२ फेब्रुआरी, १९२९.


( ८ )

 देशपर्यटनाचा मोठा फायदा—देशाटन केल्यापासून होणाऱ्या अनेक लाभांपैकी एक मोठा फायदा सर्वतोमुखीं असलेल्या आर्येत गोवला गेला नाही हे आश्चर्य होय ! शास्त्रग्रंथविलोकन होवो, पंडितमैत्री घडो वा मनुष्यास चातुर्य येवो, दूरदेशीं गेल्याने स्वदेशप्रीति आणि आपलेपणा यांना जी अपूर्व भरती येते तिच्या इतके महत्त्व उपर्युक्त तिन्ही लाभांस नाही ! हिंदुस्थानांत पहावें तो हा हिंदु, तो मुसलमान, अमका खिश्चन, तमका बंगाली, एक गुजराथी, दुसरा ब्राह्मणेतर असे किती तरी पक्षोपपक्ष वाढलेले दिसतात. केवळ आपल्या पक्षाचा नव्हे म्हणून एकमेकांची तोंडें न पहाणारे लोक हिंदुस्थानांत आढळावेत

४४