पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/54

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

असेल असा कोणाचा तर्क झाल्यास तो सपशेल चुकीचा ठरेल ! पोस्टाचे उत्पन्न बुडू नये म्हणून हा खटाटोप केला जातो. कोणाही प्रवाशाजवळ पोस्टाने पाठविण्याजोगा पत्रव्यवहार सापडतां कामा नये. सापडल्यास दंड द्यावा लागतो असा निबंध आहे. मेहेरबानीची गोष्ट इतकीच की, ओळखपत्र फक्त उघड्या पाकिटांतून बरोबर नेण्याची सवलत इराणी सरकारने ठेवली आहे ! असें असतांना देखील इराणी पोलिस अधिकाऱ्यांनी माझ्या सामानांतील 'केसरी'चे अधिकारपत्र ज्या कोऱ्या पण उघड्या पाकिटांत घालून ठेवलें होतें तेवढेंच काढून घेतलें आणि दंड भरण्यास अमुक ठिकाणीं जा असा अविचारी हुकूम फर्माविला ! पोलिस शिपाई तें पत्र घेऊन बसला आणि 'कसा चोर पकडला' या यशस्वी मुद्रेने मजकडे पाहून हसूं लागला. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांना भेटल्यावर माझ्या हातून काय गुन्हा घडला हें मला कळलें ! कारण पोलिस इतर कांही न बोलतां मागे फिरा असेंच सांगत होता. वरिष्ठ अधिकारी जरासा समजूतदार दिसला, म्हणून त्याला तें पत्र उघडून वाचून दाखविलें. त्याच्या वरची तारीख दाखवून त्याची खात्री करून दिली की, हे कांही इराकमधील किंवा दुसऱ्या प्रदेशांतील व्यक्तीस उद्देशून लिहिलेलें पत्र नसून माझें अधिकारपत्र आहे, तें मला सदैव बरोबरच बाळगावें लागतें. परंतु प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही हार खावयास लावणारी त्याची विद्वत्ता होती, त्याचें कांही केल्या समाधान होईना. पाकिटांत घातलें की, तें पत्र पोस्टांत जाण्यास योग्य झालें, ही त्याची ठाम समजूत दिसली. पण आणखी वाद घातल्यावर स्वारीने मोठ्या मनाने पुढे जाण्यास परवानगी दिली आणि पुनः अशीं पत्रें जवळ न ठेवण्याची सूचना मोठ्या सावधगिरीने आणि अधिकारयुक्त वाणीने

४८