पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/72

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

 यांत्रिक कलेची पूर्णता झालेली पहावयाची असल्यास रॉकेल भरण्यासाठी पांढरे चौकोनी डबे करंतात ते खाते पहावें. चापट पत्रा घेऊन त्याचे पाहिजे त्या आकाराचे तुकडे कापून त्यांवर शिक्का मारून त्याचा डबा बनविण्याचे काम यंत्रे अगदी अचुक आणि त्वरेने करतात. माणसांनी फक्त तुकडे पुढे सरकवावे किंवा कळ दाबावी, यापलीकडे त्यांना कांही काम करावे लागत नाही. डबे तयार झाल्यावर ते झाळून त्यांना पॉलिश करण्याचे, वरील कडी लावण्याचे व नंतर त्यांत तेल भरण्याचे काम इतक्या तातडीने आपोआप होत असते की, सर्व यंत्रांपुढून नुसते चालत जाईपर्यंत प्रथमच्या यंत्रांत कापण्यासाठी घातलेल्या पत्र्याचे डबे तयार होऊन त्यांत तेलही भरले जातें ! डबे इकडून तिकडे नेण्यासाठी 'चालता पट्टा ' आहे, त्यावरून डबे पुढे जातात आणि काटकोनांतही वळतात. या ठिकाणची क्रिया फारच कुतूहलोत्पादक आहे. मागला डबा येऊन पुढल्या डब्यास अशा बेताने धक्का देतो की, त्यायोगे तो बरोबर काटकोनात वळून पुढे जात राहील. रहदारीच्या वेळी माणसांना सुद्धा इतक्या व्यवस्थेने जातां येत नाही, अशा रीतीने निर्जीव रॉकेलचे भरलेले डबे जात असतात. तेल भरण्याचेही काम असेच आपोआप होते. एकदीड मिनिटाच्या आंत दहा बारा डबे एकदम एक थेंबही न सांडतां बरोबर भरले जातात. त्यांची तोंडे बंद करून त्यांना थोडे आदळआपट करतात ते अशाकरिता की, या वेळीच गळती वगैरे दोष दृष्टोत्पत्तीस यावेत. लाकडी चौकटींत दोन दोन डबे भरून ते चालत्या पट्टयाने थेट बोटीच्या धक्क्यापर्यंत जातात.

 अशा या घासलेट तेलाच्या कारखान्याने सुमारे पाच चौरस मैल जागा व्यापिली असून पंधरा हजार लोकांना काम दिले आहे. कारकुनां-

६६