पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/80

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

 इराकचें सरकार हिंदुस्थानपेक्षा अधिक प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. त्याचे एक मंत्रिमंडळ असून मुख्य मंत्रीही असतो. प्रचलित परिस्थतीत सर्व मंत्रिमंडळाने राजिनामा दिला असून नवीन मंडळ बनण्याची आशा दिसत नाही. तरी नवे हाय कमिशनर लवकरच येतील तेव्हा बरेच महत्त्वाचे राजकारण बाहेर पडेल असे म्हणतात. इंग्लंडशी बरोबरीच्या नात्याचा तह केला तरच मंत्रिमंडळ होऊ शकेल अशी भाषा राष्ट्रीय वृत्तीच्या लोकांत ऐकू येते. मंत्रिमंडळाने राजिनामे दिले असले आणि राजेसाहेबांनी ते स्वीकारले असले तरी, नवे प्रधान कामावर येईपर्यंत जुन्या दिवाणांनी अधिकारन्यास करूं नये असे ठरले गेले आहे. तेव्हा मुख्य मंत्र्यांची भेट घडणे मला जरा दुरापास्तच होते. एक तर अधिकारदंड खाली ठेवलेला आणि केवळ 'लोकाग्रहास्तव ' कार्यालयांत नावापुरते यावयाचे ही आजकालची रीत; आणि दुसरे म्हणजे इस्लामी धर्माप्रमाणे सर्वांचा दिवसभर उपवास असतो. तेव्हा पूर्वसंकेत केल्याने 'केसरी'च्या प्रतिनिधीस मुलाखत देण्याचे मुख्य मंत्र्यांनी ठरविले. श्री. अबदुल म्हासीन बेग सादून हें त्यांचे नांव. त्यांना इंग्रजी बोलण्याचा सराव नाही आणि नेहमीची प्रचारांतील अरबी भाषा केसरीच्या प्रवासी प्रतिनिधीस कशी अवगत असणार ? ही नवी अडचण तत्काळ दूर झाली. मुख्य मंत्र्यांचा कारभारी इंग्रजी बोलण्यांत पटाईत होता व त्याला 'इटरबटर' ( इंटरप्रिटर-दुभाषी-या इंग्रजी शब्दाचा हिंदुस्थानी अपभ्रंश ) नेमून मुलाखतीस प्रारंभ झाला.
 दरबारी आदबीचे शिष्टाचार झाल्यावर प्रधान मंत्र्यांनी पौर्वात्य राष्ट्रांतील वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींस भेटण्यांत आपणांस किती आनंद वाटतो ते बोलून दाखविलें. आणि हिंदी गृहस्थाचा परिचय घडून

७४