पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/89

हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंदी स्वातंत्र्यास सहानुभूति

 "नेहरू रिपोर्ट मला पहावयाला मिळेल काय ?" अशी पृच्छा केल्यावर त्यांना माझ्याजवळची एक प्रत देण्याचे मी अभिवचन दिले. बंगाली पुढारी कोण ? टिळकांच्या देशांतले मोठमोठे राजकारणी हल्ली कोण आहेत ? 'सट्यामूर्टी ' कोठे असतात ? हेही चौकस बुद्धीचे प्रश्न ऐकून हिंदी राजकारणाची त्यांची जिज्ञासा व्यक्त झाली. हिंदी राजकारणावर इतक्या मोकळेपणाने बोलण्याचा प्रसंग फारा दिवसांनी आल्याने मलाही मौज वाटली.
 त्यांची प्रश्नमालिका संपल्यावर मी माझ्या शरसंधानास प्रारंभ केला. हिंदी लोक इराकमध्ये आहेत, त्यांना हिंदुस्थानांत पाठविण्याचे जे सत्र सध्या चालू आहे त्याच्या बुडाशीं काय हेतु आहे ? हा प्रश्नच प्रथम अगदी स्पष्टपणे विचारल्यावर त्याचे उत्तर असें आलें -
  "इराकी प्रजेसाठी इराकचे राज्य' अशी जर आमच्या लोकांची आकांक्षा असली तर त्यांत दोष देण्यासारखे काही नाही हे तुम्हांलाही मान्य होईलच, ही मागणी अगदी नैसर्गिक आहे आणि तीच आमच्या देशांत चालू आहे. हिंदी लोकांनाच येथून जावे लागते अशांतला प्रकार नव्हे. अगदी आमच्या धर्माचे अरब लोकही आसपासच्या असीरिया, आर्मीनिया इत्यादि प्रांतांतील असले तरी, ते काढून त्या जागी इराकी नेमावेत अशी आमची इच्छा आहे; ती रास्त आहे की नाही हे तुम्हीच ठरवा.

 "हिंदी स्वातंत्र्याच्या लढ्यास आमची पूर्ण सहानुभूति असून वारंवार हें मत प्रदर्शित करणारे लेख अरबी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असतात. ज्या देशांत टिळक, गांधी, दास, लालाजी, नेहरु इत्यादि पुढारी झाले तो देश अत्यंत भाग्यवान् म्हटला पाहिजे, आमच्या देशांत अद्याप पुढारीच कोणी नाही म्हणून आम्ही मागसलेले आहोंत, हिंदी

८३