पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/90

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

राष्ट्र लवकरच पूर्णपणे स्वतंत्र होवो अशीच आमची इच्छा आहे. कारण सर्व राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळावे अशी वृत्तीच खरी राष्ट्रीय बाण्याची म्हणता येईल. मीही राष्ट्रीय मताचा आहे."
 या थोर व्यक्तीचे नांव सांगणे इतक्यांत इष्ट नाही. पण इराकतील ते पं. जवाहरलाल आहेत, एवढे वाचकांच्या जिज्ञासेसाठी सांगावेसे वाटते. अल्पवयांतच इंग्लंडमध्ये इराकचे वकील म्हणून ते कांही काळ रहात होते यावरून त्यांच्या योग्यतेची कल्पना येईल.

–केसरी, २ एप्रिल, १९२९.


( १३ )

 सर ससून हे ब्रिटिश वैमानिक खात्याचे दुय्यम अधिकारी नुकतेच हिंदुस्थानांत येऊन 'पहाणी ' करून गेले हे तर सर्वश्रुतच आहे. त्यांची पहाणी असावयाची कसली ? हिंदुस्थान ते इंग्लंड वैमानिक दळणवळण चालू करण्यासाठी सर ससून आले असे भासविण्यांत आले आणि ती नवीन टपालची सोयही एप्रिलच्या आरंभापासून अमलात येईल. पण त्यांचा अंतस्थ हेतु अगदी निराळा होता. हत्तीचे दाखवावयाचे दात वेगळे आणि खाण्याचे दात निराळे असतात, तशांतलाच हा प्रकार. सरसाहेब बगदाद-बसरामार्गे कराचीस आले होते. बसऱ्याला वैमानिक नौकांचे मोठे ठाणे करण्याची योचना निश्चित करणे हे त्यांचे मुख्य कार्य होते व त्यांनी ते पार पाडलेही. 'सी प्लेन बेस' असे बसऱ्याचे नवें लष्करी महत्व आहे. सिंगापूरला आरमारी ठाणे, बगदाद येथे वैमानिक दलाचे मुख्य केंद्र आणि बसऱ्यास वैमानिक नौकांचा पुरवठा अशी ही कडेकोट तयारी कोणत्या आगामी संकटासाठी चालली आहे कोण जाणे !

८४