पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/91

हे पान प्रमाणित केलेले आहे.

'वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा'

 बसऱ्याला वैमानिक नौकांचा तळ ठेवला म्हणून कांही बिघडलें असे नव्हे; पण मुख्य गंमत आहे ती बातमी गुप्तपणे पसरविण्यांत. वैमानिक नौका इंग्लंडहून निघाल्या तेव्हा साहजिकच रूटरने तार दिली की, साम्राज्यांतील वैमानिक नौकांच्या तांड्यापैकी कांही भाग बसऱ्यास जाण्यासाठी निघाला. यांत विशेषसें कांहीच नसले आणि हिंदुस्थानांत किंवा अन्यत्र ही तार जशीच्या तशीच प्रसिद्ध झाली असली तरी, बसरा व बगदाद येथे लगेच वर्तमानपत्रांना कानमंत्र गुप्तपणे देण्यात आला. 'साम्राज्यांतील ' हा शब्द गाळून टाकण्याविषयीची ती गुप्त सूचना होती. 'इराक' हा साम्राज्याचा एक घटक असल्याचे सर्वत्र मोठ्या डौलाने सांगितले जाते. साम्राज्यांत लागू असणाऱ्या पोस्टाच्या सवलती इराकच्या बाबतींत खऱ्या ठरतात; पण इराकी जनतेस मात्र ‘आम्ही केवळ मँडेटरी सत्ताधारी आहोंत' असा सोवळेपणाचा आव आणून बजावलें जाते. तेव्हा ही समजूत कोणत्याही प्रकारे धुतली जाऊ नये म्हणून वरचेवर इंग्रजी वर्तमानपत्रांवर खासगी रीत्या नियंत्रण घालावे लागते. इराकी प्रजेला इंग्रजांनी कसे भुलविलें याचे हे अगदी क्षुल्लक उदाहरण आहे. हिंदुस्थानांतून इराकला टपाल पाठविणे झाल्यास पाकिटाला दोन आणे द्यावे लागतात. कारण इराक हा ब्रिटिश साम्राज्यांतील एक भाग आहे. पण इराकमधून हिंदुस्थानला तेवढ्याच पाकिटाकरिता तीन आणे टपालखर्च पडतो. इराकी लोकांशी बोलतांना, 'छे:, कुठले साम्राज्य अन् कुठले काय ? तुमचा आमचा संबंध फक्त राष्ट्रसंघाने आमच्यावर जबाबदारी लादली म्हणून आला. तुम्ही स्वराज्यास पात्र झालां, राष्ट्रसंघांत तुमचा प्रवेश झाला की, आम्ही आपले निघून जाऊं.' अशी भाषा वापरली जाते. नृपनीतींचे खरे स्वरूप असेंच नाही का?

८५