पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

प्रश्न.
 "अं हं. आम्ही आईला विचारल्याविगर कुठंच जात नाही. इथंसुद्धा आई सोबत येऊन ठराव करून गेलीय. अन आई म्हणते की दोनतीन वरसांनी आम्ही शान्या झाल्यावर ती दुसरीकडे कामाला धाडायची न्हाई. तवा आताच पैसे जमवून बँकेत ठिऊन द्यायचे."
 "तुमच्या घरात शिकलेले कोण कोण आहेत?" मी विचारते.
 "आमची आई सातवी पास हाये. धाकटी मावशी घाटीच्या दवाखान्यात शिष्टर आहे . आन मामा कंपाउंडर हाये.आमचे दादा नॉन मॅट्रिक हायेत. आमच्या मावशीला खूप पगार मिळतो." रेखाने उत्तर दिले.
 कधी कधी वाटते , अवतीभोवतीचा अंधार कधीच संपणार नाही. खेड्यापाड्यातल्या , झोपडपट्टीतल्या लेकीबाळींचे जिणे कधीच बदलणार नाही. परंतु असा एखादा जरी अनुभव आला तरी मनाला दिलासा मिळतो, की क्षितिजावर हालचाल सुरू झालीय . उजाडेल.. किमान परवा तेरवा तरी !

܀ ܀ ܀
सहा

 तीनसाडेतीनशे वालिका. त्यांचा चिवचिवाट.. कलकलाट सुरू आहे. त्यांना गप्प करण्यासाठी पाचसहा संयोजक जीव तोडून प्रयत्न करीत आहेत. पण आज दावण सोडून मोकळेपणी उंडारणारी ही वासरं जाम ऐकायला तयार नव्हती. सोळा सतरा गावच्या मुली एकमेकींशी गप्पा मारण्यात दंग होत्या. त्यांच्यासमोर मला व्याख्यान होते. खरे तर या पोरींसमोर व्याख्यान देणे ही त्यांना नि मला शिक्षाच होती. मी त्यांच्यासमोर बडबडगीते सादर केली. पण तीही त्यांना भावली नाहीत. कारण गाण्यातल्या राणीची बाग, चॉकलेट, जिराफ इत्यादी गोष्टी त्यांना अपरिचित होत्या. मग मी ठरवले की चक्क गोष्ट सांगायची. गोष्ट सुरू झाली.
 " एक मुलगी होती, ती अगदी लहानशा खेडयात रहायची. तिचे वडील पाटलाच्या शेतात काम करायचे. आई पण लोकांच्या शेतात मजुरीला जायची. तिला एक भाऊ होता. ती शाळेत जाई. आणि मुलगी? ती काय बरं करीत असेल?"
 "न्हानग्याला सांभाळत असेल..."
 "कवाबवा साळत जात असेल..."
 "माई बरुबर कामाला जात असेल..."
 मुलींची सामूहिक उत्तरे.
 "ती मुलगी लहानपणी शाळेत जायची. पण तिच्या पाठीवर लहान बहीण जन्मली. तिला सांभाळण्यासाठी ती दुसरीतून घरी बसली. पण तिची वाचनाची आवड कमी झाली नाही. दिसेल तो कागदाचा तुकडा घेऊन ती वाचत बसे.

उमलतीचे रंग, गंध ॥ २७ ॥