पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/172

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ३८ । । । दाराचा स्वभाव [ बनियरचे प्रवासवृत्त पृ. ६-७ ] राजपुत्र दाराच्या अंगीं चांगले गुण कांहीं कमी नव्हते, त्याच्या संभाषणांत नम्रता, वादांत हजरजबाबीपणा, वागण्यांत सभ्यता व औदार्य कोणाच्याहि प्रत्ययास येत; पण स्वतःच्या मोठेपणाची त्याने भलतीच कल्पना करून घेतली होती. आपल्या बुद्धिचातुर्याने पाहिजे ते आपण करू शकू असे त्याला वाटे. आणि तो असे समजे कीं, आपल्यास सल्ला देण्यास समर्थ असे या जगांत कोणीहि नाहीं. जे सल्ला देण्यास धजत त्यांच्याबद्दल तो तुच्छतापूर्वक उद्गार काढी. यामुळे त्याच्या बंधूनी चालविलेले कटहि त्याला कळविणे त्याच्या मित्रांना अशक्य झालें. तो फार तापट, चिडखोर, फटकळ, आणि मोठमोठ्या उमरावांबरोबरहि उद्धटपणे वागे. मात्र त्याचा राग अगदी थोडा वेळच टिकत असे. मुसलमानी धर्मात जन्मला म्हणून त्याप्रमाणे तो आचरण ठेवी एवढेच. जाहीर रीत्या जरी दारा मुसलमान असला तरी खाजगी वर्तनांत हिंदूशी हिंदूप्रमाणे व खिस्त्यांशीं खिस्त्याप्रमाणे तो वागे. त्याच्या परिवारांत कित्येक हिंदू पंडित व ख्रिस्ती पाद्री असत व त्यांना तो देणग्याहि देई. -- कांहींचे म्हणणे असे आहे कीं, दारा कोठल्याच धर्माचा नव्हता. आणि केवळ हौसेखातर तो या किंवा त्या धर्माप्रमाणे बोले. कांहींचे म्हणणे असे आहे की, राजकीय उद्देश डोळयांपुढे ठेवून तो असा वागे, कारण तोफखान्यांत बरेच ख्रिस्ती होते ते आपलेसे व्हावेत व मांडलिक हिंदु राजांचेंहि आपणांस साहाय्य मिळावे म्हणून त्यांच्या मताप्रमाणे तो वागे. -- ५८ ]