पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/187

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास महाराष्ट्रीयांचा स्वभाव [चिनी प्रवासी ह्युएनत्संग याने महाराष्ट्रीयांचे केलेले वर्णन, ‘भगवान् बुद्धासाठीं ले. श्री. शंकरराव देव, या पुस्तकांतून (पृ. १५३ पहा.) येथे दिले आहे. ह्युएनत्संगासंबंधी अधिक विवेचन प्राचीन विभाग उतारा क्रमांक ३१ पहा.] " लोकांचा बांधा उंच व राहणी साधी व सरळ आहे. परंतु हे लोक स्वभावाने मानी, व भावनाप्रधान असून कोपिष्ट आहेत. ते अब्रु व कर्तव्य यांना सर्वश्रेष्ठ स्थान देतात आणि मरणाला तुच्छ लेखतात. ते उपकाराबद्दल कृतज्ञ राहतात, परंतु अपमानाचा सूड घेतल्याशिवाय राहात नाहींत. अपमानाचे शल्य जरूर तर प्राणाचा बदला देऊनहि ते काढून टाकतात. परंतु आपत्कालीं जो शरण येईल त्याला स्वतःचे पोट मारूनहि ते मदत करतील. जेव्हां अपमानाचा बदला घ्यावयाचा असतो तेव्हां ते प्रतिपक्षाला. अगोदर सूचना देतात व नंतर दोन्ही पक्ष शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव करून हातांत भाले घेऊन परस्परांशी लढतात. युद्धांत त्यांच्यापुढे जे माघार घेतात त्यांचा ते पाठलाग करतात व जे शरण येतात त्यांना ते प्राणदान देतात. त्यांचा नायक जर पराजित झाला तर ते त्याला स्वतः देहदंड देत नाहीत, तर त्याला फक्त स्त्रीवेष धारण करण्याला देतात. तो या लांछनापासून स्वतःची मुक्तता करून घेण्यासाठी बहुधा आत्महत्याच करतो. थोडक्यांत म्हणजे हे लोक भारतांतील एक पराकाष्ठेचे शूर व दाक्षिण्यवृत्तीचे क्षत्रिय आहेत. अभ्यास :-उपरोक्त वर्णन आजच्या महाराष्ट्रीयांशी कितपत जुळते ? २]