या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
छबिन्यांत येऊन दाखल होण्यास कांकूं करणाऱ्या गांवकऱ्यांच्या नांवानें जबरदस्त पांचजन्य करीत, ही सैतानसेना एखाद्या मारुतीच्या, म्हसोबाच्या किंवा गांवांतील चावडीच्या पटांगणांत येऊन ठेपते आणि तेथें दुपार लोटून जाईपर्यंत यथेच्छ धुळवड खेळल्यावर आंघोळीकरितां तींतील वन्हाडी विहिरीवर, तळ्यावर, ओढ्यावर, नदीवर किंवा आपल्या घरीं जाऊं लागतात. धुळवडीचा दिवस हा या सणाचा अत्यंत लाजिरवाणा दिवस आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं. अशा प्रकारचा पशूपणा खरो- खरीच कायद्यानें एकदम बंद केला पाहिजे. पण जो कोणी सरकारला अशी सूचना करील त्याच्या नांवानें अधिकच पांचजन्य होऊं लागेल यांत संशय नाहीं !
 या सणाचे कित्येक भक्त असें म्हणतात की, एकसमयावच्छेदेंकरून सर्व देशभर होळ्या पेटविल्यानें व त्यांत दूध, तूप व पोळ्या जाळल्यानें जो सुवासिक धूमकल्होळ उत्पन्न होतो त्यामुळें मनुष्याच्या जीवितास अपाय - कारक असें, वातावरण व्यापून राहणारे परमाणुरूप सूक्ष्म कृमि नाशास पावून हवा शुद्ध होते, व रोगाचें बीज नाहींसें होतें; तसेंच होळीच्या भोंवतीं बोंब मारण्याची आमच्या पूर्वजांनी जी चाल घातली आहे तीवरून असें व्यक्त होतें कीं, आग लागली असतां तिचा उपशम करण्यास बोंब मारण्यासारखा उत्कृष्ट उपाय नाहीं ! कारण या अद्वितीय भारतीय शिंगाचा किंवा टेलिफोन- चा स्वर कानी पडल्याबरोबर चार लोक चोहोंकडून धांवत येतात, आणि आग विझविण्याचा प्रयत्न करितात ! शिमग्यांत जो बेताल विचकट - पणा चालतो तोहि केवळ वावगा आहे असें नाहीं. ज्याप्रमाणे ठाणावर डांबून घातलेला घोडा मस्त होतो, त्याचप्रमाणें मनुष्यस्वभावांत ज्या दोन- चार दांडग्या वृत्ति आहेत, त्यांना नेहमींच कोंडून ठेवलें तर त्या फारच त्रासदायक होतात; सबब कधी कधीं त्यांना खुल्या करणें जरूर आहे. एंजि- नांत फार वाफ जमली तर ती रक्षकद्वारानें ( Safety valve) सोडून दिली पाहिजे, नाहीं तर तिच्या अनावर सामर्थ्यामुळे समग्र एंजिनाचे तुकडे होतात. मनुष्यांच्या विकारांचीहि तशीच गोष्ट आहे. पाळीपाळीनें साऱ्यांची सोय लाविली पाहिजे. अलंकारिकांनी नवरसांत बीभत्स रसाचाहि समावेश केला आहे, हे ध्यानांत ठेवण्यासारखे आहे. दुर्भाषण करणें, खातेयत लोळणें,