या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८५

पांचजन्याचा हंगाम

उच्चनीचत्वाचा भाव टाकून क्षणभर लहानथोरांनी बरोबरीच्या नात्यानें एक- मेकांशी वागणे, थट्टा करणें वगैरे गोष्टी इतर गोष्टींप्रमाणेच मनुष्यास हव्याशा व अवश्य वाटतात; ज्याप्रमाणे इतर गोष्टींनीं त्याप्रमाणे यांनींहि त्याचें मनोरंजन व सुखवृद्धि होते; तेव्हां यांचाहि अगर्दीच निषेध करतां कामा नये
 ही विचारसरणी शिमग्याच्या भक्तांस केवळ निरुत्तर वाटणार आहे, व जे पूर्वपद्धतीचे लेखक आमच्या या निबंधाविरुद्ध आपली लेखणी उचलतील ते या सरणीचे आपापल्या कलाप्रमाणे वेडेंवांकडें भाषांतर कर- तील याविषयीं आम्हांस शंका नाहीं ! तथापि मनांतल्या मनांत आपण सैतानाचा पक्ष घेऊन भांडतों आहों, असें त्यांस वाटल्यावांचून राहणार नाहीं. वाईट कृत्यांकडे मनुष्याची सहज प्रवृत्ति आहे. त्या प्रवृत्तीच्या समाधानापासून उत्पन्न होणारें सुख त्यास प्राप्त होण्यासाठी विशेष काल, विशेष सण, किंवा विशेष ऋतु नेमिले पाहिजेत असें नाहीं. अशा प्रकारचें शिक्षण देण्यासाठी शाळा घालण्याची गरज नाहीं. मनुष्याच्या सांप्रत स्थितीत दुर्वृत्तींचा अंकुर त्याबरोबरच जन्मास येतो, आणि लहानपणापासून तो खुडून टाकण्याचा किंवा समूळ उपटण्याचा प्रयत्न केला नाहीं तर स्वल्प वयांत तो सारे अंत:करण आपल्या विषारी विस्तारानें व्यापून टाकून, सद्- वृत्तींची वाढ बिलकुल होऊं देत नाहीं. तेंव्हां शिमग्याच्या सणासारखे सण नाहींसे करून टाकल्यास आमचें कोणत्याहि प्रकारचें नुकसान होण्याचा संभव नाहीं. शिमग्यावांचून शिमग्यांतले निंद्य प्रकार आपल्या व इतर समाजांत नित्य घडत असतात. आम्ही मात्र त्यांना धर्माच्या नांवानें फाजील उत्तेजन देऊन आपलें अधिक नुकसान करून घेत आहों.
 क्षणभर असें समजा कीं, होळीच्या किंवा धुळवडीच्या दिवशीं एखादा जिज्ञासू प्रवासी जर्मनींतून किंवा चिनांतून येथे आला, आणि रस्तोरस्ती चाललेला दंगा व बोंबाबोंब पाहून हा काय प्रकार असावा, हें समजून घेण्याच्या इराद्यानें त्यानें कोणा एखाद्या गृहस्थापासून जागोजागी झडत असलेल्या लावण्यांचा आणि उखाण्यांचा अर्थ समजून घेतला तर तो या आमच्या सणाविषयीं आणि सार्वजनिक नीतिमत्तेविषयीं काय कल्पना करील बरें ? ज्या गोष्टीबद्दल दुसऱ्यापुढे आपणांस अधोवदन करावें लागेल व जी