या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आयर्लंडाकडे पाहून तरी जागे व्हा
( बांधवहो, गिझनीच्या महंमदानें सोमनाथ येथील मूर्ति फोडून जो खजिना लुटला त्यानें, तैमूरलंगानें स्वारी करून तलवार आणि विस्तव यांनीं जो प्रलय करून दिला त्यानें, अबरंगजेबाने दक्षिणेपर्यंत स्वाऱ्या करून जो कहर करून सोडला त्यानें १७३८ त अफगाणच्या चोरानें जो धुमा- कूळ मांडिला होता त्यानें, किंवा १७५९ त अबदालीनें जी कत्तल उडविली तिनें, तुमची निद्रा दूर झाली नसेल तर प्रस्तुत काली आयर्लंडांत जो प्रकार चालला आहे तो ऐकून तरी जागे व्हा, आणि देश सुखी कशानें होतो, याचें तत्त्व उमजा.)
 जे लोक तुम्हा महाराष्ट्रीयांवर स्त्रेणत्वाचा आरोप करीत असतील, जे तुमच्या अंगीं एकी नाहीं, राजकारणकौशल्य नाहीं, ज्ञान संपादण्याची इच्छा नाहीं, मोठेपणा मिळविण्याची चाड नाहीं, आणि स्वातंत्र्याची गोडी नाहीं, असें म्हणत असतील ते तुमचे मित्र नव्हत, तर शत्रु होत, असें समजून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊं नका, व आपला आपणच धिक्कार करण्यास लागूं नका. पुराणपूर्व कालापासून पेशवाईचा लय होईपर्यंत ज्ञान, शौर्य, परोपकार, देशप्रीति, स्वामिभक्ति, प्रजावात्सल्य, इत्यादि गुणांबद्दल जे येथें नांव ठेवून अमर होऊन गेले आहेत, त्यांचे नित्य स्मरण करीत जाऊन, व सध्यां आपणांत जे दोष वसत आहेत, त्यांचें शांतपणे निरीक्षण करून, आपल्यापेक्षां पुढील पिढी ज्ञानानें, सद्गुणानें व सुखांनें श्रेष्ठ कशी होईल या गोष्टीचें मोठया काळजीनें चिंतन करा, आणि मनांत घरलेला हेतु तड़ीस जाण्यास जे उत्तम उपाय असतील, ते शोधून काढून अमलांत आणण्या- विषयीं रात्रंदिवस परिश्रम करा. जे ज्या देशांत जन्माला येतात, जे ज्या देशांतील संपत्तींचा उपभोग घेतात, व ज्याचें ज्या देशांतील सुधारणेवर प्रत्येक प्रकारचें सुख अवलंबून असतें, त्यांनीं त्या देशांतील ज्ञानाचा, संपत्तीचा, नीतीचा व स्वातंत्र्याचा विस्तार करण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली नाहीं, तर त्यांच्यांत, आणि त्याच देशांत उपजीविका