या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

८८

करून आयुष्य कंठणारे जे खालचे जीव त्यांत भेद तो कोणता ? मनुष्यांत आणि पशूंत जो मुख्य भेद आहे, तो हा कीं पशूंना आपले ज्ञान, व आपलीं सुखें, हवीं तितकीं वाढवितां येत नाहींत. मनुष्याची गोष्ट तशी नाहीं. त्याच्या अंगीं वाग्विचारादि ज्या अनेक शक्ति आहेत, त्यांच्यामुळे त्यास आपलें ज्ञान आणि सुख हवे तितकें वाढवितां येणार आहे. कित्येक वेदात्यांना ज्ञानाची आणि सुखाची वृद्धि करण्यांत कांहीं दांशील वाटत नाहीं; आणि कदाचित् त्यांचें म्हणणें खरेंही असेल. पण ज्ञानवृद्धत आणि सुखात कांहीं तात्पर्य नाहीं, हें ज्ञान होण्यास तरी अगोदर किती ज्ञान संपादावें लागतें ? तसेंच, ज्ञानसंपादनाच्या पाठीमागे जे लागले आहेत, ते सारेच वेदाती झाले, असे कधीही होत नाहीं. पुनः ज्या अर्थी वैराग्य आणि आधिभौतिक सुखोप- भोग, या दोनही गोष्टी अनेक वर्षे लोकापुढे असता, बहुतेकाची प्रवृत्ति पहिल्याकडे न होतां दुसन्याकडे होत आहे, त्याअर्थी मनुष्यप्रकृतीला साधारणपणें आधिभौतिक सुखोपभोग अधिक इष्ट आहे, हें निर्विवाद सिद्ध होतें. समजूं लागल्यापासून मरेतोंपर्यंत, जो तो होईल तितकें सुख संपाद- ण्याच्या, व तें भोगण्याच्या धादलींत असलेला दृष्टीस पडतो, व तो तीत इतका निमग्न होऊन गेलेला असतो, की त्याला आपलें खरें सुख कशात आहे, तें कशानें प्राप्त होईल, तें पुष्कळ दिवस टिकेल कशानें, याचा विचार करण्यास, किंवा तें प्राप्त झालें असता थोडा वेळ त्याचा स्वस्थपणें उपभोग घेण्याससुद्धां वेळ सांपडत नाहीं ! यामुळे होतें काय, की प्रत्येक मनुष्याला आपापल्या आवडीनावडीप्रमाणे, चाहील त्या सुखाच। यथेच्छ उपभोग घेतां येण्यास, ज्या सार्वजनिक गोष्टीकडे त्याच्या चित्ताचा काही भाग, निदान मधून मधून तरी, वेधला पाहिजे, तो वेधेनासा होऊन, सर्वोच्या सुखाच्या पायाभूत ज्या गोष्टी, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे, व्यक्तींच्या सुखाची इमारत एकदम ढासळून जाऊन तींत वास करणाऱ्यांच्या कपाळीं पारतंत्र्य येतें व त्यांस नित्य कष्टभारी व्हावें लागतें ! पृथ्वींतील ज्या ज्या राष्ट्रांकडून या सर्वसामान्य व सर्वाधाररूप गोष्टीकडे जोपर्यंत दुर्लक्ष झालें नाहीं, तोंपर्यंत त्या त्या राष्ट्रांत ऐश्वर्य, संपत्ति, ज्ञान व शीर्ष यांचा अव्याहत विस्तार होत गेला. ज्या दिवशीं या गोष्टींस ते पराङ्मुख झाले, त्या दिवशी त्याच्या मोठेपणास उतरता पाया लागला, व अखेरीस त्याचा -हास झाला. पृथ्वी-