या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९५

कवि,काव्य,काव्यरति

असल्यास त्याला किंचित् छाट बसतो -- इत्यादि गोष्टी वाचकांच्या ध्यानांत येतील अशी आशा आहे.
 काव्याच्या वाचनापासून राजापासून रंकास, तत्त्ववेत्त्यापासून अत्यंत अल्पशिक्षित मनुष्यास, सर्व स्थितीत आनंद होण्यास अनेक कारणे आहेत. एक तर कवींच्या वाणींतून जे बोल निघत असतात, त्यांच्या सत्यतेविषयीं प्रत्येक अंतःकरण साक्ष देत असतें. जीं सत्यें देशकालादिकांनीं मर्यादित, किंवा जीं सत्यें बहुश्रुतांस मात्र समजणार, अशीं सत्यें कवि कधींच सांगत बसत नाहीं. ज्या मनुष्याची रानटी अवस्था सुटली आहे, ज्याला मानवी स्वभावाचें किंचित् ज्ञान प्राप्त झाले आहे, ज्याच्या मनावर बाह्य सृष्टीच्या सौंदर्याचा परिणाम होऊ लागला आहे, असा मनुष्य कोणत्याही देशांत रहात असो, किंवा कोणत्याही शतकांत जन्मास आला असो, महाकवींच्या सत्यमय रसाळ उद्गारामृताचे सेवन करण्यास तो योग्य असतो. काव्या- पासून आनंद होण्याचें दुसरें कारण असें आहे कीं साधारण मनुष्यास ज्या गोष्टी अव्यक्त असतात, त्या कवि त्यास व्यक्त करून देतो. जितक्या मूर्ति तितक्या प्रकृति अशी आपल्या लोकांत म्हण आहे. या म्हणीचा अर्थ इतकाच कीं प्रत्येक मनुष्याचा स्वभाव निराळा असल्यामुळे सर्वांच्या स्वभा- वांचं ज्ञान होणें अशक्य आहे, तथापि ज्या अर्थी सर्व मनुष्यांस आपण 'मनुष्य' या एका वर्गाखाली मोडता, त्या अर्थी त्या सर्वोस साधारण असे कांहीं गुण असलेच पाहिजेत; या साधारण गुणांचें अति स्वल्प ज्ञान बहुते - कांस असतें; व तें असतें म्हणून काव्यवाचनापासून त्यांस आनंद होतो. कित्येक मनुष्य पराकाष्ठेचे रागीट असतात, कित्येक शांत असतात, कित्येक मायाळू असतात, कित्येक लोभी असतात, कित्येक क्रूर असतात, कित्येक कामातुर असतात. तथापि राग, शांति, ममता, लोभ, क्रौर्य व काम इत्यादि सर्व मनोवृत्तींची प्रत्येकास थोडीबहुत ओळख असते. विशिष्ट व्यक्तींत एखादा गुण फार असला म्हणून बाकीच्या गुणांविषयीं तो अगदीं अज्ञान असतो असें नाहीं. प्रत्येक मनुष्य सर्व मनुष्यतेचें सूक्ष्म प्रतिबिंब आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. असें नसतें तर एकाचे मनोविकार दुसऱ्याला न सम- जते. साधारण मनुष्यांत आणि कवींत भेद इतकाच आहे कीं साधारण मनुष्यांस ज्या प्रकृतिवैचित्र्याचें आणि विकारवोचत्र्याचे ज्ञान अगदी