या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भांडवल गेलें; व्यापार गेला.

१०

 ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची त्याप्रमाणें व्यापाराला भांडवलाची आव- श्यकता आहे. ज्या देशांत भांडवल नाहीं, तेथें व्यापार कोठून चालणार ? मुसलमान लोकांनी येथे अनेक शतकें राज्य केलें. पण त्यांच्या त्या दीर्घ- कालीन अंमलाने आम्ही जितके डबघाईस आलों नाहीं, तितकें या शतसांव- त्सरिक ब्रिटिश अंमलानें आलों आहों याचें कारण उघड आहे. तैमूरलंग झेंगीजखान, गिझनी महंमद यांनी या देशावर ज्या स्वाऱ्या केल्या, त्यांमुळें आमचे अतोनात नुकसान झालें हें खरें आहे. पण तें नुकसान, ब्रिटिश अंमलामुळे आमचें जें नुकसान होत आहे त्यापुढें कांहींच नाहीं, असें म्हणण्यास हरकत नाहीं. मुसलमान लढवय्यांनी जे द्रव्य लुटून नेलें तें सांच- विलेलें द्रव्य होतें. त्याचा व्यापाराशी तादृश्य संबंध नव्हता. शेपन्नास वर्षांनी एखादी झुंड येऊन कोटि दोन कोटि रुपयांची लूट घेऊन गेली तर तीपासून होणारे नुकसान आणि प्रतिवर्षी उत्पादक संपत्तीपैकी बाहेर जात असलेल्या दहापाच कोटींपासून होत असणारे नुकसान यांचें साम्य कोठून होणार ? तसेच हि ध्यानांत ठेवणें जरूर आहे की, मुसलमानांचा अंमल येथें कायम झाल्यापासून, येथला पैसा बहुधा बाहेर गेला नाहीं. इंग्रजांप्रमाणे मुसलमान पिशवी भरली कीं विलायतेस पळणारे नसल्यामुळे, त्यांच्या अंमलापासून द्रव्यदृष्ट्या आमचें म्हणण्यासारखें नुकसान झालें नाहीं. आतांप्रमाणें त्या वेळेस मोठमोठ्या हुद्यांच्या जागा जिंकणाऱ्यांच्या जातभाईस मिळत असत. परंतु त्यांचें नेहमींचें राहणें येथें पडल्यामुळे, त्यांचा सारा खर्च येथेंच होत असे व त्यामुळे व्यापारधंदा करणाऱ्या लोकांस किंवा कारागीर लोकांस मोठें नुकसान झाल्यासारखं वाटत नसे. मशीदीचे दगड घडविणें किंवा देवळाचे दगड घडविणें ; ताजमहाल बांधणे किवा काशीविश्वेश्वराचे देऊळ बांधणे; पेशव्यांसाठी शालजोड्या विणणें किंवा बादशहाकरितां मोलाचे गालीचे तयार करणें, मस्तानीसाठी निवडक जवाहीर विकर्णे किंवा नूरजहानच्या सांगण्या- बरून सारा देश धुंडाळून पाचेचे सर्वोत्कृष्ट खडे पैदा करणें-यांत त्या त्या