या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आगरकर : व्यक्ति आणि विचार
 

चित्रित करण्यांतही त्याची प्रतिभा चतुर असेल; पण जीवनाच्या गाभ्याशी,हृदयांत खोलखोल लपवून ठेवलेल्या मानवतेच्या मूक दु:खांशी त्याच्यापेक्षां भवभूतीचाच अधिक परिचय आहे. कालिदास वाचकाला स्वर्गांत नेणारा महाकवि असला तर भवभूति त्याला पाताळांत नेणारा महाकवि आहे. या कल्पनेनें प्रेरित होऊन मी भवभूतीचा अभ्यास करू लागलो तेव्हां त्याच्या बाह्यतः सामान्य भासणाऱ्या एकेका चरणांत किती उत्कट काव्य भरलें आहे याची मला जाणीव होऊ लागली. आदर्शाच्या मागे लागणाऱ्या ध्येयवादी महात्म्याचे दुःख हेच मानवी जीवनांतले सर्वात मोठे दुःख आहे,हे सांगण्याकरितां रामचरित्राची निवड करणाच्या त्याच्या प्रतिभेचे तर मला पहिल्यापासूनच कौतुक वाटे. पण पुढे पुढे कालिदासाच्या कल्पनारम्य चरणांनी होणाऱ्या गुदगुल्यांपेक्षांही अनुभूतीला जागृत करणाऱ्या आणि डोळ्यांपुढे रसपूर्ण करुणरम्य चित्रे उभी करणाऱ्या भवभूतीच्या अनलंकृत ओळींनीं मनाला लागणारा चटका मला अधिक सजीव आणि अधिक सुखद वाटू लागला. 'अविदितगतयामा रात्रिरेव व्यरंसीत् ’ हा चरण असलेल्या श्लोकाचें ज्या दिवशी वर्गांत विवेचन झाले त्या दिवशी रात्री माझ्या डोळ्यांपुढे वनवासांतल्या राम आणि सीता यांच्या मूर्ती पुनःपुन्हा उभ्या राहू लागल्या. माझ्या मनांत कितीतरी कल्पनातरंग उद्भवले-तारकांचे दीप आणि वृक्षांचे पंखे असलेल्या धरित्रीच्या उघड्या महालांत त्या प्रेमळ दंपतीने काय काय गोष्टी केल्या असतील ? स्वयंवराच्या वेळी रावण शिवधनुष्यभंग करण्याकरितां उठला, तेव्हां आपली छाती कशी धडधडू लागली हें त्यावेळी सीतेनें रामाला सांगितलें असेल काय ? पितृवचन पाळण्याकरितां कैकयीच्या इच्छेप्रमाणे आपण चौदा वर्षांचा वनवास हंसतमुखानें स्वीकारला, पण तो स्वीकारतांना हें ऐकून सीतेला किती दुःख होईल या विचारानें मनांतल्या मनांत आपण अत्यंत अस्वस्थ झालों होतो हें रामचंद्रानें हंसत हंसत सीतेपाशी कबूल केलें असेल काय ? सूर्याच्या साक्षीनें माणसें मोठमोठ्या प्रतिज्ञा करतात. पण त्यांच्या अंतरंगांतल्या नाजुक सुखदुःखांच्या स्मृती तारकांच्या साक्षीनेंच प्रगट होत असतात.

 'रात्र संपली; पण गोष्टी संपल्या नाहीत.’ एक सहजसुंदर उद्गार ! जितका साधा तितकाच रम्य आणि भावमधुर. जितका प्रसादपूर्ण तितकाच