या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

१२०

अर्थ आहे ? त्यांत जेवढा ग्राह्यांश असेल तेवढा अलबत घ्या, व त्यांचें काळजीपूर्वक रक्षण करा. ) पण त्यांच्या कृतींत जीं दोषस्थले असतील ती काढून टाकून तीत नवीन भर टाकण्याचा प्रयत्न केल्याशिवाय तुमचा निभाव कसा लागेल ? पुढील उपमेबद्दल कदाचित् कोणास वाईट वाटेल, पण सारासार विचार करतां एखाद्या पराक्रमी पुरुषाच्या बहुभाष विधवे- प्रमाणें आम्हां भारतीयांची स्थिति झाली आहे, असें आम्हांस वाटतें ! पति- निधनामुळे नवीन संतानाची आशा खुंटलेली ती गतभर्तृका ज्याप्रमाणें अस- लेल्या अपत्यांचे दृढालिंगन करून ' आमचे पुरुष असे होते, आमच्या पुरुषांनीं तसें केलें ' अशा प्रकारचे गुणानुवाद गाण्यांतच आपलें समाधान मानून घेते, व आपल्या जीविताची कृतार्थता समजते त्याप्रमाणे जुन्या थोर पुरुषांचे गुण गाण्यांतच आमच्या पुरुषार्थांचीं परमावाधे होऊन बसली आहे !