या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १२२
स्थानच्या राज्यापेक्षां हिंदुस्थानशीं व हिंदुस्थान हाती असल्यामुळे सर्व आशिया खंडाशीं, करतां येत असलेल्या व्यापारापासून अधिक फायदा होत आहे. तेव्हां जर आम्ही आपल्या व्यापाराचे पुनरुज्जीवन मनापासून करूं लागलों, तर त्यांना उघडपणें जरी त्याला प्रत्यवाय करतां येणार नाहीं तरी आमचा सगळा व्यापार आमच्या हातीं फिरून पडूं देण्यापेक्षां आमर्चे राज्य ते आम्हांस अधिक आनंदानें परत देतील ! आम्हां हिंदु लोकांस युरोपिअन किंवा अमेरिकन लोकांप्रमाणें नाना तऱ्हेच्या अनेक वस्तूंचा उपभोग घेण्याची हौस लागलेली नाहीं, व त्या मानानें त्या वस्तू उत्पन्न करण्यास लागणारी चलाखी आमच्या येथें दृष्टीस पडण्याचा संभव नाहीं है जरी खरें आहे, तरी ज्या थोड्या वस्तू आम्हांस लागतात, व ज्यांचा खप आम्हांमध्यें अधिकाधिक होत आहे, त्या सर्व सरकारनें कांहीं वर्षे मदत दिल्यास येथल्या येथें कमी खर्चाने करतां येण्यासारख्या आहेत हैं त्यांना ठाऊक नाहीं किंवा समजत नाहीं असें नाहीं. पण व्यापाराच्या कामांत सरकारने हात घालूं नये हा सामान्य औपपत्तिक नियम - त्याचें मिष करून ते आमच्या व्यापाराकडे ढुंकून देखील पाहत नाहींत, असें म्हणण्यास हरकत नाहीं. तथापि दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होत जाणाऱ्या पंचवीस कोटी प्रजेचें बिनबोभाट राज्य करणेंही कांहीं सोपें काम नाहीं. विहिरींत पाणी नसेल तर तें पोहऱ्यांत येण्याचा संभव नाहीं, हें आमच्याप्रमाणे त्यांसही चांगले समजते. तेव्हां प्रजेची हलाखी दृष्टीस पडूं लागली म्हणजे तिच्या चौकशीसाठी एखादें कमिशन नेमावें, शेतकऱ्यांस कांहीं सूट किंवा तगाई द्यावी, करांत एखादा फेरफार करावा, शेतकीची सुधारणा करण्याचें अवडंबर घालून कोठें एखादा कालवा काढ, कोठें तळें बांध, कोठें विहीर खण, कोठें कापसाचे किंवा गव्हाचे बी वाट, कोठें शेतकीचे प्रयोग करण्यासाठी एखादें फार्म ( शेत) तयार कर, कोठें झाडे लाव, कोठें तोफा सोडून पाऊस पाड- ण्याचा प्रयत्न कर, कोठें गुरांचें इस्पितळ घाल, कोठें खताचे प्रयोग करून दाखीव, कोठें सावकाराला ओरबाडून शेतकऱ्याला वांचविण्याचा प्रयत्न कर, कोठें शेतकीची व्यवस्था पाहणारें खातें काढून त्यावर हुशार पण भारी पगाराचे अधिकारी नेम, कोठें रस्ते कर, कोठें झाडाचे छाट तोडूं दे व जंगलांतील गवत मोफत किंवा हलक्या किंमतीनें नेऊ दे, कोठें शेतीस व