या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मूळ पाया चांगला पाहिजे १२७
हूँ प्रमेय पुढे ठेवून वर्तन करणे, व ज्याचे त्यानें कायदे केल्यास त्यापासून अधिक सुख होत हा सिद्धांत पुढे ठेवून वागणे यांत जमीन-अस्मानाचें अंतर आहे. पुराणातरीं वर्णन केलेल्या रामचंद्रापेक्षांडी अधिक न्यायी, अधिक प्रजाहितेषी असा राजा असून, त्याने केलेल्या कायद्यापासून, प्रजेस कितीही सुख होत असलें तथापि ते करण्याचा त्यास अधिकार पोचत नाहीं, या तत्त्वावर नजर देऊन फायद्याकडे दृष्टि न देतां आपले गेलेले हक्क योग्य उपायांनी मिळविण्याकरितां जे लोक, हें आपले कर्तव्य समजून निश्चयानें यत्न करीत आहेत, ते सामाजिक सुधारणा नको व राजकीय सुधारणा पाहिजे, असा आग्रहही धरीत नाहीत.
 इंग्रज गुन्हेगाराचा न्याय इंग्रज न्यायाधीशानेच करावा, व नेटिव्ह गुन्हे- गाराचा न्याय तेवढा वाटेल त्या न्यायाधीशानें करावा, असा पक्षपात कां ? गुन्हेगाराचा न्याय तोडणें हें कांहीं त्याच्या रंगावर अवलंबून नाहीं. काळ्या रंगाच्या मनुष्याने एखादा गुन्हा केल्यास त्याचा न्याय करण्याची ज्यास योग्यता आहे, तोच न्यायाधीश, तोच गुन्हा करणाराचा रंग गोरा असला कीं, त्याचा न्याय करण्यास अपात्र कसा होतो ? हे प्रश्न सर्वोस सुचणें अवघड नाहीं. परंतु त्याचा योग्य निकाल होण्यास नुसतें त्या प्रश्नांचें शाब्दिक ज्ञान उपयोगी नाहीं. प्रश्न करणारांचें अंतःकरण व ओंठ यांच्यांत विसंगतता असेल तर त्यानें कितीही आक्रोश केला तथापि व्यर्थ होय. परंतु त्या दोहों- मध्यें संगति असेल तर, विशेष आक्रोश करण्याचीही जरूर पडत नाहीं. अंतःकरण व ओंठ यांच्यांत तारायंत्र सुरू असेल तर हळू उच्चारलेल्या शब्दांसही विलक्षण जोर येतो व त्यापुढे सर्वास मान डोलवावी लागते. खऱ्या साध्वीच्या ईषत् वक्रदृष्टीनें मोठमोठ्या बलाढ्य कामांधांची गाळण उडून जाते. आपण स्वतां अन्यायाचें वर्तन करणारास दुसऱ्याच्या अन्याया - बद्दल बोलण्याचा अधिकार पोचत नाहीं, तर उलट त्याची जीभ कचरूं लागते, त्याचा शब्द तोंडांतल्या तोंडांत घोंटाळू लागतो, व असें झालें म्हणजे सिंहाचें कातडें पांघरणाऱ्या गर्दभाच्या बाहेर डोकावूं पाहणाऱ्या लंब कर्णावरून, त्याची परीक्षां होते, व त्यास दुसरे भीत नाहींत. इतकें नाही तर स्वतांची फजिती उडण्याची मात्र उलट पाळी येते.
 महाराची सावली पडली असतांही विदाळ मानणारे लोक