या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३३ आणखी एक शहाण्याचा कांदा
 व्यभिचाराचे तिसरें कारण आमच्या स्त्रियांचें अज्ञान होय. असें हे साहेब म्हणतात, पण त्याविषयीं आम्हांस थोडी शंका आहे. ज्ञान आणि सदगुण यांचा अन्योन्य संबंध कितपत आहे हैं अद्यापि चांगलेंसें ठरलेलें नाहीं. ज्ञानाचा प्रसार झाल्यानें खून, दरखडे, मारामाऱ्या वगैरे मोठमोठ्या गुन्ह्यांची संख्या कमी होते, असें पुष्कळ विचारी लोक कबूल करतात. पण खोटें बोलणें, बनावट कागद करणें, खोट्या साक्षी देणें, चतुराईनें दुसऱ्यास फसविणें, लांच खाणे, व्यभिचार करणें, खोट्या शपथा घेणें वगैरे कमी दुष्टपणाचे गुन्हे वाढतात किंवा कमी होतात याविषयीं जितका संशय अरि- स्ट्रॉटल यास होता तितकाच हर्बर्ट स्पेन्सर यासही आहे. तेव्हां अज्ञानामुळे आमच्या स्त्रिया विशेष व्यभिचारी होत्या, व आतां त्यांस थोडेबहुत लिहितां वाचतां येऊं लागले आहे, म्हणून आमच्यांतील व्यभिचार कमी होऊं लागला असला पाहिजे, असें जर कोणी इंग्रज आम्हांस सागूं लागले तर त्याचें आम्हांस हंसूं आल्यावांचून राहणार नाहीं ! कोणत्याही देशांतील लोकांनी दुसऱ्या देशांतील लोकांस व्यभिचारी ठरविण्याचें धाडस करूं नये; म्हणून आम्ही इंग्लिश लोकांच्या व्यभिचाराविषयीं कांहीं एक म्हणत नाहीं; तथापि जर ते आपण होऊन तो दोष आमच्या स्त्रियांवर अविचाराने आणूं लागतील, तर तुमच्या मडमांनी आमच्या स्त्रियांचें तीर्थ घेऊन त्या पापा- पासून मुक्त व्हावे इतक्या त्या पवित्र आहेत, असें म्हणण्यास आम्ही कर्धीही सोडणार नाहीं ! हिंदुस्थानांतील स्त्रियांच्या पातिव्रत्याइतकें शुद्ध पातिव्रत्य बहुधा दुसऱ्या कोणत्याही देशांत सांपडणार नाहीं,