या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३५ विविध विचार
होणार नाहीं; व सरतेशेवटी आपल्या प्रभावानें ' मन सुधारकी रंगलें, अवघे जन सुधारक झाले ' असें करून टाकल्याशिवाय ती राहणार नाहीं !

X X X
२. मलमपट्ट्यांनी रोग बरे होत नाहींत.

 जगाची जी खरी स्थायिक सुधारणा होते, ती विपत्तीच्या दर्शनानें उत्पन्न होणाऱ्या आकस्मिक हृत्क्षोभानें किंवा त्या विपत्तीच्या निरसनार्थ आवे- शाच्या भरांत कांहीं तरी सुचविलेल्या उपायानें होत नसते. विपत्तीचें निर्मूलन करण्याची प्रवृत्ति होण्यास ती पाहून खेद झाला पाहिजे, व त्या खेदाबरोबर ती घालविण्याचा कांहीं तरी उपाय करावा, असें वाटलें पाहिजे. या दोन गोष्टी प्रथम झाल्याखेरीज मनुष्याच्या हातून कोणत्याही प्रचंड विपत्तीचें निर्मूलन होणार नाहीं हें खरें आहे. पण एवढ्या दोन गोष्टी झाल्या म्हणजे तें निर्मूलन होईलच असेंही खात्रीनें सांगतां येत नाहीं. आपण ज्या जगांत राहत आहों तें अनेक प्रकारच्या दारुण विपत्तींनीं ओतप्रोत भरले आहे, हें खरें आहे, आणि त्या विपत्तींची संख्या थोडी कमी झाल्याखेरीज आमची येथील वस्ती सुखावह होण्याचा संभव नाहीं, हि खरे आहे. पण येवढ्यावरून विपत्ति दृष्टीस पडली कीं, ती नाहींशी करण्यासाठीं प्रथमदर्शनीं जो उपाय सुचेल तो करीत सुटावें, असें सिद्ध होत नाहीं. कधीं कधीं अशा प्रकारच्या उपायांनीं नफा न होतां उलट नुकसान होतें. सगळ्या झाडाला कीड लागून जाऊन तें अगर्दी वठून गेलें असलें व त्याची फळे आळ्यांनीं भरून जात असली तर त्याच्या वरच्या सालीवर किंवा फळावर औषधोपचार करून काय फायदा होणार आहे ? क्षारोदकादि ज्या उपायांची योजना करावयाची असले त्यांचा परिणाम त्यांच्या अंतर्सालीवर किंवा मुळावर झाला तरच त्यापासून कांहीं फायदा होण्याचा संभव आहे. ज्याप्रमाणे हाडापर्यंत जाऊन भिडलेला व्रण त्याच्या तोंडावर चोपडलेल्या तेलांनीं किंवा मलमाच्या पट्ट्यांनी बरा होण्याची आशा नाहीं; त्याप्रमाणे समाजाच्या हाडापर्यंत जाऊन खिळलेल्या व शैकड़ों वर्षे वाहत असलेल्या अमंगलाचाररूप व्रणांचे निराकरण भलत्याच प्रकारच्या कायद्यांनी होण्याचा संभव नाहीं.