या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३९विविध विचार

जाग दुसरा समजणे अशक्य वाटतें. पण रानटी लोकांस अशा प्रकारचें वस्त्वंतर समजत नाहीं. ज्याच्याकडून त्यांना कांहीं अप्रिय घडेल अशी भीति असते त्यास ते शत्रु किंवा गुन्हेगार समजून त्याचा पराभव करण्यास व त्याला गुलाम करण्यास उद्युक्त असतात. साक्षात् पोटच्या पोरांपासून त्यांस त्रास होऊं लागला तर त्याना मारून टाकण्याची त्यांस शंका वाटत नाहीं, मग इतरांची कथा काय ? अशा स्थितीतील राजेहि सामान्य मनुष्याप्रमाणें क्रूर असतात व ज्याप्रमाणें सामान्य व्यक्ति आपल्या सामर्थ्याचा दुसऱ्यास वचक राहण्यासाठी वर सागितल्यासारखें निर्दयपणाचें वर्तन करण्यास प्रवृत्त होते त्याप्रमाणें राजेही आपल्या प्रजेस व आपल्या शत्रूस आपली दहशत पडण्या- साठी अशाच प्रकारचें क्रूर वर्तन करतात. लढाईत जिंकलेल्या लोकांचीं डोकी उडविणें, हातपाय तोडणें, त्याना मिरच्याच्या बुऱ्या देणें, लिदींत पुरणे, तापल्या तोफांवर बांधणे, कडेलोट करणें, हत्तीच्या पायाखालीं देणें, त्याचीं नाकें व कान कापणें, आणि त्याच्या घशात शिसें तापवून ओतणें हे निर्दयपणाचे प्रकार लढाईत फेद केलेल्या शत्रूकडील लोकांचा छळ करण्याकरतां जसे योजण्यात येतात, त्याप्रमाणे प्रजेपैकींहि कोणी मनुष्यानें अपमान केला, हुकूम तोडला, किंवा बंडाचा घाट घातला तर त्याला शिक्षा करण्यांतहि योजण्यात येतात. राजापराधाकरितां सुळावर चढविणें, जेथें खून केला असेल तेथें सर्व लोकांसमक्ष फांशी देणें, भर चवाठ्यावर फटके मारणें, हे सर्व सध्या कित्येक ठिकाणी अंमलांत असलेल्या शिक्षेचे प्रकार सर - कारच्या सामर्थ्याची दहशत लोकांस असावी, येवढ्यासाठीच आहेत. राजा सिंहासनारूढ होतो, म्हणजे तो मनुष्यांचा स्वामी होतो येवढेच नाहीं, तर सिंहासारख्या बलवान् हिंस्र पशूसहि जिंकून त्याच्या पाठीवर बसतो, असा या शब्दात गर्भितार्थ आहे. साराश काय की, अर्धवट सुधारलेल्या स्थितीत सामाजिक आचार जितके क्रूर असतात तितकेच राज्याचारहि क्रूर असतात, असें सहज सिद्ध करून देतां येतें. कारण दुसरे पहिल्यांपासूनच निघालेले असतात. ज्यांना हे विचार आपल्या समाजाच्या संबंधानें किती खरे आहेत हैं पाहावयाचें असेल त्यांनी महाभारतांतील कांहीं गोष्टी वाचून त्याचें आपल्या मनाशीं शांतपणें चिंतन करावें. दुःशासनाच्या नरडीचा घोट घेऊन त्याच्या विदारलेल्या वक्षःस्थलापासून निघणाऱ्या रुधिरांत भिजविलेल्या