या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

औगरकर : व्यक्ति आणि विचार : १४४
भेदाहून फार निराळा आहे. तसेंच, अध्ययन व व्यवसाय यांच्या भेदाप्रमाणें तत्त्ववेत्ते, कवि, राजकारस्थानी, शिल्पी, वैद्य, वकील, सावकार, शेतकरी, ऋणको, धनको असे लोकसंख्येचे अनेक वर्ग होणे यांतही कोणत्याही प्रकारचा अस्वाभाविकपणा नाहीं. पण येथें ज्या प्रकारचा जातिभेद रूढ आहे त्या प्रकारचा जातिभेद वृद्धिंगत न होतां जितका क्षीण होत जाईल तितका बरा, असें कोणीही समंजस मनुष्य कबूल करील. असें असतां, जो मतभेद दहापांच वर्षांत, चर्चेची टकळी चालली असतां, रसातळास जाणार व ज्या सुधारणा पाश्चिमात्य शिक्षणाचा सपाटा आणि ब्रिटिश अंमल यांमुळे पन्नास वर्षांत सहज घडून येणार, त्यासाठी नवीन जात करण्यास सल्ला देणारांचें सौजन्य किंवा दूरदर्शित्व यांचे काय वर्णन करावें ?

XXX
९. पायावांचून कळस उभारणारे शहाणे


 जे लोक राजकीय प्रकरणांत स्वतंत्र असतात, ते सामाजिक व धार्मिक प्रकरणांत स्वतंत्र असतातच असा नियम नाहीं. किंबहुना राजकीय स्वातंत्र्य असून सामाजिक व धार्मिक गोष्टीत अत्यंत तीव्र दास्यपाशानें सर्व प्रकारें जखडलेले असे अनेक लोक असतात. कांहीं अंशी नष्ट झालेले राज- .कीय स्वातंत्र्य फिरून संपादणें सवघड आहे. कारण, तें हिरावणारा शत्रू परका असतो, व त्याचा मोड केला म्हणजे तें फिरून प्राप्त होण्यासारखे असतें. ' सामाजिक व धार्मिक गुलामगिरीची तशी गोष्ट नाहीं. अगोदर फार वर्षाच्या सवईमुळे अशा प्रकारची गुलामगिरी, गुलामगिरी आहे असे पुष्कळांस वाटेनासे झालेलें असतें. ज्याप्रमाणे शरीरांत अनेक वर्षे ठाणें करून राहि- लेल्या व्याधीपासून फारसा त्रास होईनासा होतो, त्याप्रमाणें जे कष्टावह सामा- जिक व धार्मिक आचार- ते आपणांपाठीमागें केव्हां लागले, ते परिहार्य आहेत किंवा अपरिहार्य आहेत, त्यांचा अंमल आपणांवर कोणाकडून होत आहे, तो अंमल करण्याचा त्यास काय अधिकार आहे वगैरे गोष्टींविषयी आपणास गूढ अज्ञान असतें - ते आचार त्रयस्थास कितीहि पीडाकर वाटले तरी खुद्द आपणास ते तसे वाटत नाहीत. तथापि त्यांपासून आपल्या शरीरा- वर व मनावर जे दुष्परिणाम होण्यासारखे असतात, ते होतच असतात.