या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १५६ दोन दिवस नाहीं, वर्षेच्या वर्षे अर्धपोटी, दुसऱ्या दिवसाची चिंता करीत व झोपेची प्रार्थना करीत, रात्रीच्या प्रहरी जमिनीवर अंग टाकण्याचा प्रसंग यावा, आणि शरीरांत व मनांत उत्साहाचें पुनरुज्जीवन न होता, आंथरूण सोडून हातपाय ओढीत रोज सकाळीं फिरून उद्योगास लागणे भाग पडावें, किती शोचनीय आहे बरें ? रात्रंदिवस दुष्काळाची धास्ती; अनेक प्रका- रच्या रोगांनीं, विशेषतः अपुरत्या अन्नामुळें, वस्त्रामुळे व राहण्याच्या घाण जागेमुळें, उत्पन्न होणाऱ्या तापानें ज्याच्या त्याच्या घरांत दृष्टीस पडणारी विपत्ति; गाल बसलेले, डोळे खोल गेलेले, सान्या अंगास वळ्या पडलेल्या. सारांश, भुकेनें सर्व प्रकारें गांजून आयुष्यास कंटाळलेल्या लोकांचे गांवोगांवीं व शहरोशहरी दिसणारे थवे - हें पाहून आमच्या नीतिमान्, ज्ञानवान् व दयावान् राज्यकर्त्याविषयीं स्वाभाविकपणे जितकी पूज्यबुद्धि उत्पन्न व्हावी तितकी होणे शक्य आहे काय ?

१७. खरा सुधारक


 लोकांच्या कल्याणाचा जो हेतु मनांत घरला असेल तो कोणत्या उपा- थानें लौकर तडीस जाईल व कोणत्या साधनाने एकंदरीत आपल्याला किंवा दुसऱ्याला कमीत कमी त्रास होईल याचा शांतपणानें निश्चय ठरवून तदनुसार वर्तन करावें, हेंच सत्पुरुषांस योग्य आहे. हा निश्चय कर- तांना खरी सुधारणा कशांत आहे हें फारच काळजीनें ठरविलें पाहिजे. कारण वारंवार होतें काय कीं, विशिष्ट वासनाधीन किंवा मताधीन झालेल्या मनुष्यास वास्तविक सुधारणा कशांत आहे हें नीट न समजून, जेवढे जुनें असेल तेवढें फेंकून देण्यांत व कसल्या तरी नवीन गोष्टींचा अंगी- कार करण्यांत आपण सुधारणा करीत आहों असा भ्रम होतो ! असल्या लोकांस सुधारक म्हणण्यापेक्षां दुर्धारक म्हणणें हेंच बरें ! उदाहरणार्थ, हिंदु धर्मात बरीच ब्यंगें आहेत म्हणून यहुदी, महंमदी, ख्रिस्ती किंवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या धर्माचा अंगीकार करणाऱ्या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देतां येणार नाहीं. तसेंच, आमचे कांहीं रीतरिवाज मूर्ख - पणाचे आहेत म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचें अनुकरण करणें हेंहि कोण-