या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६१ विविध विचार

कीय हक्क संपादण्यासाठीं जें करणें असेल तें आम्हीं केलें पाहिजे; नीति- प्रसार, संपत्युत्पादन, आरोग्यरक्षण वगैरे अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्ञानाधीन असल्यामुळे लोकशिक्षणाचे काम जितक्या झपाट्याने चालवेल तितक्या झपा ट्याने चालविलें पाहिजे; जातिभेद नाहींसा झाला पाहिजे, स्त्रीपुरुषांच्या ज्ञानांत व स्वातंत्र्यात जेवढे अंतर राहू देणे अपरिहार्य अमेल तेवढ्याहून अधिक ' राहिल्यास पूर्ण संसारसुख प्राप्त होण्याचा संभव नाहीं, म्हणून स्त्रियांची उन्नति करण्याबद्दल रात्रंदिवस झटले पाहिजे; वगैरे धार्मिक, राजकीय व सामाजिक ! विषयांसंबंधानें स्थूल औपपत्तिक सिद्धांत जसे एकाला तसे दुसऱ्यालाही संमत आहेत. दोघांत जो मतभेद पडतो तो आज तारखेस हे सिद्धान्त अमलांत आणण्यासाठी काय करतां येईल व तें कोणत्या साधनाने करतां येईल, या- संबंधानें पडतो. या घटकेस साध्य असलेल्या सुधारणेची इयत्ता आणि तिचीं साधनें यांविषयीं टिळकांचे बहुतेक विचार सामान्य लोकांस मान्य होण्या - सारखे असल्यामुळे, किंवा त्यांस मान्य असलेल्या विचारांबाहेर जाण्यास टिळक तयार नसल्यामुळे, त्यांचे वर्तन भवभूतीनें रामचंद्राकडून वदविलेल्या-

स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि
आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति मे व्यथा


 ( स्नेह, दवा, सौख्य, फार तर काय लोकांच्या संतोषासाठी मला जान- कीचा देखील त्याग करावा लागला तरी त्याबद्दल खेद वाटणार नाहीं ! ) या श्लोकार्थीप्रमाणे होत आहे, व या क्षणीं ते अत्यंत लोकप्रिय झाले असून, प्रत्येकाच्या तोंडांतून त्यांचे नांव निघत आहे, पण लोकांना आज ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या या इतभाग्य लेखकास पसंत नसल्यामुळे, लोकछंदानुवर्तन त्याला अशक्य झालें आहे इतकेच नाहीं, तर लोकांस अप्रिय परंतु पथ्य- कारक असे विचार त्यांच्या मर्जीविरुद्ध पुनः पुन्हां त्यांचेपुढे आणणें हेंच आपले कर्तव्य व जीविताचें सार्थक अशी त्याची दृढ कल्पना झाली असल्या- मुळें, धार्मिक व सामाजिक गोष्टीत आपलें ज्ञान विकटोपर्यंत जाऊन पोहोंचलें आहे, व तत्संबंधक आचारांत सुधारणा करण्यास म्हणण्यासारखी जागा राहिलेली नाहीं, निदान त्या कामांत सरकाराचे किंवा कायद्याचें