या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६३ विविध विचार

कंपेस तरी पात्र झाले पाहिजेत. 'हा वेडापीर इतके हाल, संकटें, व लोकाप वाद सोसून ज्या अर्थी इतकी धडपड करीत आहे त्या अर्थी ती लोकांस अंतीं हितावह होईल अशी निदान याच्या मनाची तरी खात्री झाली असावी,' असा विचार त्यांच्या मनांत येऊन, त्यांनीं त्याच्या दोषांबद्दल त्यास क्षमा केली पाहिजे. त्यांनी तसें केलें तर ठीकच आहे; पण नाहीं केलें तरी त्यास विशेष वाईट वाटण्याचा संभव नाहीं; कारण, सारें जग त्यावर उलटले तरी पुढील कविवाक्याचे स्मरण करून त्याला आपलें समाधान करून घेतां येतें.

ये नाम केचिदिह नः प्रथयंत्वज्ञाम् । जानन्तु ते किमपि तान्प्रतियत्नः ॥
उत्पत्स्यतेऽस्ति मम कोपि समानधर्मा कालायं निरवधिर्विपुला च* पृथ्वी ॥

 अर्थः - खरोखरीच जे या गोष्टीत आमची निर्भर्त्सना करतात, त्यांना काहींच समजत नाहीं, व त्यांच्या करितां हा आमचा प्रयत्नही नाहीं. माझ्या शीलाचा एखादा इसम कोठें तरी असेल किंवा निपजेल; पृथ्वी अफाट आहे व काळ अनंत आहे !