या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७ गोपाळ गणेश आगरकर

मिटवून पुढल्यांस नेऊन पोंचविणें एवढेच ते आपलें कर्तव्य समजतात. धर्म-मंदिराची रचाई श्रद्धेच्या किंवा विश्वासाच्या पायावर झालेली आहे असें हिंदू धार्मिकांचेच म्हणणें आहे असें नाहीं. 'पृथ्वीवरील कोणत्याही प्रकारच्या धार्मिकांस विश्वासाशिवाय त्राता नाहीं व थारा नाही. यासंबंधाने बुद्धिवादाचे नांव काढलें कीं त्यांच्या अंगावर कांटा उभा राहतो. एकाद्या दिवाळखोर कर्जबाजाऱ्यास ज्याप्रमाणे आपल्या प्राप्तीचा आकडा आपल्या खर्चाच्या आंकड्याशीं ताडून पाहण्याचे धैर्य होत नाहीं, किंवा ज्यांची जीविताशा फार प्रबळ झाली आहे, त्यांना आपल्या रोगाची चिकित्सा सुप्रसिद्ध भिषग्वर्याकडून करवत नाहीं, त्याप्रमाणें श्रद्धाळु धार्मिकांस आपल्या धर्मसमजुती व त्यांवर अवलंबणारे आचार यांस बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाहीं.' त्यांना अशी भीति वाटते कीं, ते हिणकस ठरल्यास, पुढे काय करावें ? आम्हांला असें वाटतें कीं, असलें भित्रेपण फार दिवस चालावयाचें नाही. विवेक पूर्ण जागृत झाला नव्हता तोपर्यंत विश्वासानें किंवा श्रद्धेनें प्रत्येक गोष्टींत आपला अंमल चालविला यांत कांहीं वावगें झाले नाही. जसा लोकांस तसा मनास कोणीतरी शास्ता पाहिजे. व ज्याप्रमाणे मुळीच राजा नसण्यापेक्षां कसला तरी राजा असणे बरें, त्याप्रमाणे वर्तनाचे नियमन करणारें असें कोणतेंच तत्त्व नसण्यापेक्षां विश्वासासारखें एखादें स्खलनशील तत्त्व असणें देखील इष्ट आहे. पण हें कोठपर्यंत ? अधिक चांगलें तत्त्व अस्तित्वांत आलें नाहीं तोंपर्यंत. तें आलें कीं, जुन्या प्रमादी तत्त्वानें आपलीं राजचिन्हें श्रेष्ठ तत्त्वाच्या स्वाधीन केली पाहिजेत. हें सरळ आधिकारांतर येथून पुढे विश्वास आणि विवेक यांच्या दरम्यान होणार आहे. ’ तर्कशुद्ध व स्पृष्टोक्तिपूर्ण प्रतिपादनाच्या या सुंदर पण छोटया नमुन्यां- तही निबंधकार या नात्यानें आगरकरांच्या अंगीं वसत असलेल्या एका दुर्मिळ गुणाचा प्रत्यय होतो. तो गुण म्हणजे त्यांची कविप्रकृति. आगरकरांनीं उभ्या जन्मांत काव्याची एकही ओळ लिहिली नसेल, पण त्यांच्या २ आ