या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १८

व्यक्तित्वाचे आणि म्हणूनच लेखनाचे आकर्षकत्व त्यांच्यामध्ये सदैव जागृत असलेल्या कल्पक आणि भावनाशील कवीमुळें वाढलें आहे यांत मुळींच शंका नाहीं. प्रतिभेच्या या प्रकृतिधर्मामुळेंच ' वृद्ध हे समाजनौकेचे भरताड होत; तरुण शिडें होत !पहिल्याशिवाय समाजांत स्थिरता रहाणार नाहीं, आणि दुस-याशिवाय त्याला गति येणार नाहीं',' आरामवाटिका हीं मोठया शहराचीं फुप्फुसें होत,','दहा बारा किंवा पंधरा सोळा वर्षांच्या पोरांस संसाराचे विंचू लावण्यांत, ज्या कन्यांना ऋतु देखील प्राप्त झाला नाहीं अशांस वैधव्याग्नीनें पोळण्यांत, अथवा एकादी जाईची कळी निवडुंगावर किंवा सोनचाफ्याचे फूल कोरांटीवर आणून टाकण्यांत काय शहाणपणा वा भूषण असेल तें असो!',' भास्कराचार्यांचें भास्कराचार्यत्व वेधशाळेत' असलीं लहानमेाठीं मनोज्ञ आणि मार्मिक वाक्यें ते सहज लिहून जातात. मात्र तर्कशुद्ध पण प्रखर अशी सामाजिक टीका हा त्यांच्या निबंधाचा आत्मा असल्यामुळे त्यांच्या प्रतिभेचा प्रकृतिधर्म कवीचा असूनही कल्पनाविलासांत ते कधींही रममाण झालेले आढळणार नाहींत. पण कविप्रकृतीमुळे कुठलेंही दृश्य आपल्या डोळ्यांपुढें घडत आहे असा भास वाचकांना व्हावा इतक्या परिणामकारक रीतीनें तें चित्रमालिकांच्या साहाय्यानें रेखाटण्याची हातोटी त्यांना साधली आहे. बालविवाह आणि प्रेमविवाह यांतील विरोधाचें हें चित्र पहा. ' ज्यांच्या अवयवांची पूर्ण वाढ झाली आहे, ज्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागावर तारुण्याचें तेज चकाकत आहे, विषयवासना जागृत झाल्यामुळे उल्हासानें, उत्कंठेनें, अननुभूत सुखास्वादाच्या अहर्निश चिंतनानें ज्यांच्या अंगव्यापारांत, दृष्टींत व चर्येत लज्जा, अधीरता, साशंकपणा वगैरे परस्परविरोधी अनेक मनोविकार वारंवार प्रतिबिंबित होऊं लागले आहेत; एकमेकांस प्रिय होण्याविषयीं ज्यांचे हरएक प्रयत्न चालले आहेत; विद्या, वित्त, सौंदर्य वगैरे गुणांनी आपणांस होईल तितकें अलंकृत करून मोह पाडण्याविषयीं जे अहोरात्र झटत आहेत, ज्यांना आपण रतिमन्मथाचे पुतळे आहों, व विधात्यानें आपली विवाहमैत्री व्हावी असें योजूनच आपणांस निर्माण केलें आणि आपल्याहून अधिक सुखी असें दांपत्य कोठेही असू शकण्याचा संभव नाहीं असें वाटू लागले आहे; अन्योन्य-समागम दुरावणारा प्रत्येक क्षण ज्यांस युगतुल्य झाला असून जे सूर्याच्या अश्वास मंदगतित्वाबद्दल