या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१ गोपाळ गणेश आगरकर

गंडानें पछाडलेल्या समाजाचा राष्ट्राभिमान जागृत केला. आगरकरांनीं आपली संस्कृति श्रेष्ठ आहे, या खोट्या अभिमानाच्या धुंदीत कुंभकर्णाप्रमाणें झोंपलेल्या समाजाच्या डोळ्यांत अंजन घालून त्याला विचारप्रवृत्त केले. आत्मविश्वासाशिवाय कुठलाहि समाज जगूं शकत नाहीं. पण आत्मपरीक्षणाशिवाय त्याची कधींहि प्रगति होऊं शकत नाहीं. १९ व्या शतकांत महाराष्ट्रीय, समाजाचीं हीं दोन्हीं अंगें विकल झालीं होतीं.विष्णुशास्त्र्यांनी पहिल्याला संजीवनी दिली. दुस-याच्या बाबतीत आगरकर धन्वंतरी ठरले

मराठीचे हे पहिले दोन श्रेष्ठ निबंधकार अनेक दृष्टींनी एकमेकांचे पूरक होते. विष्णुशास्त्र्यांच्या राष्ट्रभिमानाचा वारसा लोकमान्य टिळकांकडे आला. टिळक, परांजपे, खाडिलकर, केळकर, अच्युतराव कोल्हटकर, सावरकर प्रभृतींच्या निबंधांनीं ही परंपरा दोन पिढ्या अखंड चालविली. या निबंधकारांपैकी, शिवरामपंत, अच्युतराव व सावरकर हे कविप्रकृतीचे असल्यामुळे विषयाची निवड करण्यापासून ते भाषाशैलीपर्यंत सर्वत्र हें वैशिष्टय त्यांच्या निबंधांत आढळून येतें. या दृष्टीनें त्यांचें आगरकरांशीं थोडें साम्य आहे.पण आगरकरांच्या लेखनाचा जो चिरकालीन परिणाम झाला तो मराठी निबंधावर नाहीं; तर काव्य, विनोद व कथा या ललित वाङ्मयाच्या तीन प्रमुख विभागांवर.
 केशवसुत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक गणले जातात. त्यांच्या अनेक तेजस्वी कवनांना आगरकरांच्या लिखाणापासूनच स्फूर्ति मिळाली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे मराठी विनोदाचे निर्माते. त्यांच्या विनोदी बुद्धीचे पोषण आगरकरांनी केलें नसलें तरी तिच्या विलासाला वळण लावण्याचे श्रेय त्यांनाच द्यावें लागेल. या दृष्टीनें ' सुदाम्याच्या पोह्यां' तला  'शिमगा' हा विनोदी लेख आगरकरांच्या 'पांचजन्याचा हंगाम'  या निबंधाशीं ताडून पहाण्याजोगा आहे. आगरकरांनीं 'सुधारक'  काढला तेव्हां 'महात्म्याला शोभण्याजोगें कृत्य'  असा त्यांचा हरिभाऊ आपट्यांनी जो गौरव केला त्याचा उगम नुसत्या कौतुकयुक्त आदरांत नव्हता. हरिभाऊंचें कादंबरीलेखन 'सुधारक'निघण्यापूर्वी सुरू झालेले असले तरी ज्या विशाल व भावपूर्ण दृष्टीनें त्यांनी पुढे आयुष्यभर सामाजिक कथालेखन केलें, तिचा सुंदर आविष्कार प्रथमतः