या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार ३૪

'बुक’-‘बुक ’, व 'काम-काम' करूं लागला आहे. असली अपायकारक श्रमव्यग्रता कांहीं कामाची नाहीं. तिच्या योगानें नानाप्रकारचे क्लेश सोसावे लागून आयुष्य क्षीण होतें. कधी कधीं पूर्ण अनध्याय करून मनाला व शरीराला नित्य श्रमाच्या जुंवापासून खुलें केले पाहिजे व जेणेकरून सारी वृत्ति अत्यंत उल्हासमय व कार्यक्षम होईल अशा प्रकारचें आचरण केलें पाहिजे. अशा प्रकारचें आचरण हातून घडण्याला प्रत्येकास नाना प्रकारचे खेळ खेळण्याची व सण करण्याची हौस पाहिजे.

व्यक्तिजीवनाकडे सूक्ष्मतेनें पाहणाच्या आगरकरांची राष्ट्रीय दृष्टि किती विशाल होती हें पुढील उताऱ्यावरून दिसून येईल. 'ब्रिटिश मालाचा पाय आमच्या घरांत घुसल्यापासून काय विपरीत स्थिति झाली आहे पहा; कापसाचीं बोंडें गोळा झालीं न झालीं तोंच गठ्ठे बांधून ते इंग्लंडला रवाना करण्याविषयीं इंग्रज व्यापारीकंपन्यांचे एजंट तक्षकासारखे दक्ष!हा कापूस इग्लंडला जाऊन पोंचल्यावर तेथे त्यांचीं ठाणे व्हावयाचीं आणेि तीं फिरून आमचीं ढुंगणे झांकण्यासाठीं व आम्हांपासून मूळ कापसाच्या किंमतीच्या दसपट किंमत काढण्यासाठीं परत यावयाचीं! इंग्रजी कपडयाची काय गोष्ट सांगावी? किती मऊ,किती स्वच्छ,किती स्वस्त,किती बारीक व किती हलका!... ...रावापासून रंकापर्यंत लागणारा पाहिजे तो जिन्नस-मग तो एका दमडीचा असो किंवा एक लाखाचा असो-इंग्लंडच्या कृपेमुळे त्याची आम्हांला वाण पडेनाशी झाली आहे. पण दुर्दैवामुळें एकच अडचण आम्हांला पडते. ती ही कीं, या सर्व वस्तूंबद्दल आम्हाला किंमत द्यावी लागते! त्या फुकट मिळत नाहींत! तेव्हां आतां ही किंमत कोठून द्यावी ही पंचाईत आहे! कोठून द्यावी म्हणजे नोकरी करून-सरकारच्या पदरीं सेवा करून! ठीक आहे, पण सरकार तरी सेवेबद्दल वेतन कोठून देणार? कोठून म्हणजे? करातून! कर कोणापासून घेणार? देशांतील लोकापासून! देशांतील लोक तो कर कशापासून देणार!आपल्या उत्पन्नांतून!त्यांचे उत्पन्न कोठें आहे? तें उत्पन्न म्हणजे येथील कच्चा माल! म्हणजे काय झालें कीं, हिंदुस्थानांतल्या बहुतेक लोकांनीं कुणबट व्हावें आणि कच्चा माल तयार करून तो इंग्लिश व्यापाऱ्यांच्या अडत्यांना ते मागतील त्या दरानें विकावा, आणि जी किंमत येईल तींतून सरकारला