या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार ३६ कडे अस्तित्व नाहीं. ते सात्त्विक ऐहिक जीवनाचे उपासक आहेत. प्रवृत्ति आणि निवृत्ति यांचा कलह फार प्राचीन असला तरी या कलहांत प्रवृत्ति विजयी होत आलेली आहे आणि पुढेंही तिचेंच स्वामित्व मानवी जीवनावर चालणार आहे हें सत्य ते क्षणभर सुद्धां डोळ्यांआड करीत नाहींत!'फलमूलाशन करून रहावें, पूर्ण वैराग्याचे अवलंबन करावें, पर्वताच्या गुहांत वास करावा आणि संसाराच्या भानगडीत पडूं नये असें निवृत्ति पंथाचे प्रचारक शेंकडों वर्षें सांगत असतां व बऱ्याच अंशीं वागून दाखवीत असतां, प्रवृत्तिमार्गाकडे जग अधिक अधिक चाललें आहे,’ असें सांगून ते म्हणतात,'अनेक उपभोगांची वांछा करावी,ते प्राप्त होण्यासाठीं रात्रं दिवस झटावें आणि त्यांपासून होईल तितकें सुख करून घ्यावें असा मनुष्यांचा सामान्य स्वभाव आहे!' ऐहिक सुखोपभोग हा मानवी जीवनांतला सर्वांत प्रमुख असा रस आहे. तो तुच्छ मानून मनुष्याला पारलौकिक सुखाच्या मृगजळामागें धांवायला लावणें हा आगरकरांच्या दृष्टीनें निव्वळ वेडेपणा आहे. भोगवृत्तीची वेळीं अवेळीं निंदा आणि विरक्तीची स्थानीं अस्थानीं स्तुति करणाऱ्या आपल्या साधुसंतांना सामान्य मनुष्यांचें मन आणि राष्ट्राच्या प्रगतीचे मर्म यांचे सर्वांगीण आकलनच झालें नव्हतें. संयम म्हणजे संन्यास नव्हे हें साधें सत्य ते अनेकदां विसरले. त्यामुळे विरक्तिपर उपदेशाचा मारा आणि नैसर्गिक उपभोगेच्छेची ओढ यांच्या कात्रींत सांपडलेला हिंदुसमाज परवांपरवांपर्यंत दुटप्पी जीवन कंठीत होता. या दुटप्पीपणामुळें झालेल्या कोंडमाऱ्यानें त्याला दुबळें करून सोडलें होतें. यमनियम, व्रतवैकल्यें आणि पापपुण्याच्या भ्रामक कल्पना यांच्या शृंखलांनीं जखडलेला सामान्य हिंदु मनुष्य शतकानुशतकें एखाद्या कैद्याप्रमाणें जगत आला होता.अशा सामान्य मनुष्याला दीर्घकाळाच्या तुरुंगवासांतून मुक्त करण्याचा आगरकरांनीं निकराचा प्रयत्न केला. तुरुंगाची संवय झालेल्या कैद्यांना बाहेर करमेनासें होतें म्हणे! इथेही तेंच घडलें. रूढीच्या अंधारकोठडींत कोंडलीं गेलेलीं माणसें बुद्धिवादाच्या सूर्यप्रकाशांत येतांच त्याच्या तेजानें दिपून गेलीं, त्या तेजांत कांहीं तरी विचित्र दाहकता आहे असें त्यांना वाटू लागलें, परत अंधारकोठडीत जाण्याकरतां तीं धडपडू लागलीं आणि आपल्याला या भयंकर प्रकाशाचें