या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३७ गोपाळ गणेश आगरकर

दर्शन करून देणारी व्यक्ति देवदूत नसून सैतान असली पाहिजे असा तर्क करून त्यांनी तिला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली!
आगरकरांनीं आयुष्यभर हे शिव्याशाप फुलांप्रमाणें मानले आणि झेलले, देव आणि दैव या दोन कुबडयांच्या आधारावर आजपर्यंत आपला समाज रखडत चालत आला आहे, बुद्धि आणि यत्न या दोन पायांचा उपयोग करून आपण धांवूं शकूं याचा त्याला पुरापुरा विसर पडला आहे, त्याला स्वत:च्या पायांवर उभे करण्याकरतां कुणी त्याच्या कुबडया काढून घेतल्या कीं आतां आपण जमिनीवर कोसळतों असें वाटून तो त्याच्यावर संतापल्याशिवाय राहणार नाहीं, हें सारें ते पूर्णपणें जाणून होते!पण स्वतःचा छळ करणाऱ्या मूर्ख किंवा दुष्ट लोकांना सहानुभूतीनें वागविणाऱ्या संतांचें औदार्य आगरकरांच्याही अंगीं भरपूर होतें. त्यांनी आपल्याला शिव्याशाप देणाऱ्या अंध जनतेचा कधीही तिरस्कार केला नाहीं. ख़रा सुधारक हा जितका सत्याग्रही तितकाच समाजप्रेमी असला पाहिजे अशी त्यांची निष्ठा होती. ही निष्ठा त्यांनी आमरण आचरून दाखविली.

समाजक्रांतीकरतां आवश्यक असलेली विचारक्रांति करायला प्रवृत्त झालेल्या आगरकरांनीं स्रीपुरुषांच्या पेहरावापासून त्यांच्या विवाहापर्यंत प्रत्येक गोष्टींत आपलें काय चुकत आहे आणि तें कसें सुधारावें याची न कंटाळतां सात वर्षे सांगोपांग चर्चा केली. गांवाला जायला निघालेल्या अल्पवयस्क मुलाच्या सामानाची बांधाबांध करतांना प्रेमळ आई जेवढी काळजी घेते,तेवढया वात्सल्यानें त्यांनीं सामान्य माणसांचे संसार सुखाचे कसे होतील हें पाहिलें. हें पाहतांना त्यांनीं देवाधर्माच्या आणि पापापुण्याच्या प्रगति खुंटवणाच्या सर्व कल्पना झुगारून दिल्या. मात्र त्या झुगारून देतांना, व्यक्तिस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार करतांना आणि प्रत्येकास शक्य तितके ऐहिक सुखोपभोग मिळाले पाहिजेत असें प्रतिपादन करतांना, आपल्या तत्त्वज्ञानाच्या विशाल सामाजिक बैठकीचा त्यांनीं वाचकाला कुठेंही विसर पडूं दिला नाहीं. व्यक्तिस्वातंत्र्याचे ते कट्टे पुरस्कर्ते होते. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार किंवा स्वच्छंदीपणा नव्हे,आणि दुसऱ्याच्या दुःखावर उभारलेलें सुख हें मनुष्यानें उपभेगण्याच्या लायकीचे सुख नव्हे,हें त्यांनीं पुनःपुन्हा कटाक्षानें सांगितलें.'The only freedom which deserves the name is that of